DNA मराठी

Ravi Shankar Prasad : आणीबाणीत सर्व देशाचा तुरुंग बनवून विरोधी कार्यकर्त्यांचा छळ केल्याबद्दल, जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करुन सामान्य जनतेवर अत्याचार केल्याबद्दल काँग्रेस नेते माफी मागणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. रविशंकर प्रसाद यांनी केला.

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. प्रसाद बोलत होते. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. अमित साटम, मुंबई भाजपा कोषाध्यक्ष किरीट भन्साळी, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

यावेळी खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणीत दीड लाख लोकांना देशभर अटक करण्यात आली होती. जनसंघ, समाजवादी अशा सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांना अटक करून हरयाणात तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याच तुरुंगात मोरारजीभाई देसाई यांनाही ठेवण्यात आले होते. मात्र या दोघांना भेटण्याची परवानगी नाकारली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना, जनसंघाच्या कार्यकर्त्यांचा तुरुंगात शारीरिक छळ करण्यात आला होता .

यावेळी खा. प्रसाद यांनी आणीबाणीत झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणी काळात 253 पत्रकारांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 110 पत्रकारांना मिसा खाली तर 110 जणांना संरक्षणविषयक कायद्यानुसार अटक करण्यात आली. 33 जणांना अन्य गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. अनेक ज्येष्ठ संपादकांनाही अटक करण्यात आली होती. 52 विदेशी पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात आली. ख्यातनाम पत्रकार मार्क टली सह 29 विदेशी पत्रकारांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली गेली. वृत्तपत्रांवर प्रसिद्धी पूर्व निर्बंध (प्री सेन्सॉर शिप) घालण्यात आले.

सरकारी अधिकाऱ्यांना नसबंदीचे उद्दिष्ट ठरवून दिले जात असे. 60 लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेकांचा विवाह झाला नसताना त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली, असेही खा. प्रसाद यांनी नमूद केले. या अत्याचाराबद्दल काँग्रेस नेत्यांनी आजवर माफी मागितली नाही, असेही खा. प्रसाद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *