DNA मराठी

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले!

Maharashtra Politics: महाराष्ट्राची ओळख कष्टकरी, बुद्धिजीवी आणि परिवर्तनवादी राज्य म्हणून होती. पण गेल्या काही दशकांत ही ओळख झाकोळली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे, शेतकरी अडचणीत, तरुण बेरोजगार, शिक्षण व आरोग्य व्यवस्था कोलमडलेली त्यामुळे जनता अडचणीत आहे. मात्र याच काळात नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

राज्याच्या निवडणुकांमध्ये उमेदवार दाखल करत असलेल्या मालमत्ता विवरणपत्रांवर नजर टाकली, तर अनेक नेत्यांची संपत्ती काही वर्षांत दुप्पट-तिप्पट झाल्याचे स्पष्ट होते. कुठून येतो हा पैसा? सत्तेचा वापर फक्त समाजसेवेकरता नाही, तर वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी होतो, अशीच जनता भावना बळावते.

शेतकरी कर्जमाफीसाठी विनवणी करत असतो, विद्यार्थी फी भरू शकत नाहीत, रुग्णांना उपचार मिळत नाहीत. पण मंत्रीमहोदयांच्या कोट्यवधींच्या गाड्या, फौजफाटा, बंगल्यांची झळाळी मात्र झकास असते. ही दुहेरी परिस्थिती लोकशाहीला सुरुंग लावत आहे.

महाराष्ट्रातील सत्ता म्हणजे केवळ सत्ता नव्हे, ती संपत्तीची शिडी बनली आहे. विरोधात असताना “भ्रष्टाचारविरोधी” घोषणा करणारे सत्तेत गेल्यावर मात्र त्याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतात आणि जनतेला आश्वासनांची विषारी गोळी देत राहतात.

आज महाराष्ट्राला गरज आहे ती जबाबदार नेतृत्वाची, पारदर्शक कारभाराची आणि जागरूक जनतेची. अन्यथा “महाराष्ट्र गरीब, नेते श्रीमंत” ही ओळख आपणच कायमस्वरूपी स्वीकारावी लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *