Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने 76 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले.
पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी
252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने गिलचा एक शानदार झेल घेतला. 50 चेंडूत 31 धावा काढून गिल बाद झाला.
यानंतर, विराट कोहलीने फलंदाजीला आला पण तो फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरसह डावाला पुढे नेले मात्र मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्ट्यांच्या मागे बाद झाला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची खेळी केली.
श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 48 धावा केल्या, पण रचिन रवींद्रने एक शानदार झेल घेतला. यानंतर अक्षर पटेलने 20 चेंडूत 29 धावा केल्या, पण तोही बाद झाला. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने 33 चेंडूत 34 धावा केल्या, तर जडेजा 6 चेंडूत 9 धावा केल्या.