जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार
अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.
या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही.
या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.