Ajit Pawar News : स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता असा टोला उपुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी निलेश लंके यांना लावला. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांच्या निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे, बाळासाहेब नाहटा, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, प्रविण घुले पाटील, मंगलदास बांगल, बाळासाहेब शिंदे याच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून राज्याचा विकास करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. यामुळे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करताना नगर माझे आजोळ असून येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी प्रयत्न केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासोबत चांगले सुर जुळले असून सध्याचे महायुती सरकार हे गोरगरिबांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. देशात पंतप्रप्रधान मोदींनी मागील १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर देशात पुन्हा एनडीए आणि राज्यात महायुती सरकार येणार आहे. यामुळे इतरांनी कितीही प्रतत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही असे त्यांनी सांगितले.
महायुती सरकार आणि जलसंपदा विभागाच्या मार्फत नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले ८० वर्षाच्या पुढे इतरांना संधी दिली पाहिजे, पण आमचे जेष्ठ रिटायर होतच नाही.
यामुळे आम्ही काय करायचे असे सांगत आपली खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार यांना धारेवर धरले, आधी बायकोसाठी उमेदवारी मागण्यासाठी आला नंतर लोकांनी हवा दिली आणि स्वतः खासदारकीच्या मैदानात आला अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा समाचार घेतला.
राज्यात सुजय विखे यांच्या पंजोबांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि अख्या महाराष्ट्राला याचा फायदा झाला आहे. त्यांचा नातू तरूण, तडफदार नेता डॉ. सुजय विखे पाटील हे लोकांचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडतील यामुळे त्यांना येत्या १३ मे रोजी अनु. क्र. ३ चे कमळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देवून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहायता करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.