Ahmednagar News: कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉ. बाबासाहेबांना अपमानित केले. या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे गटाने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संविधानाचे रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच होऊ शकेल हा संदेश कार्यकर्ते देत असून आंबेडकरी चळवळीची मत नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकरिता निर्णायक ठरतील असा विश्वास आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना गायकवाड म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रा. कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती केली. राज्यात महायुतीचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रियेतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. देशातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यामातून सामाजिक सुरक्षा देण्याचे काम झाले आहे. देशाची प्रगती संरक्षण आणि अधिक विकास मोदींच्या नेृत्वाखालीच होऊ शकतो हा विश्वास सर्व सामान्य मतदारांच्या मनामध्ये आहे.
नगरच्या विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली, भविष्यात हाच विकास पुढे घेवून जाण्यासाठी त्यांना निवडूण आणण्याची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मतदारांच्या पुढे मांडत आहोत. याला समाजातील सर्व घटकांचे समर्थन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधान बचावाचा कॉंग्रेसचा केवळ कांगावा करत असून, याच कॉंग्रेसने डॉ. आंबेडकरांचा पराभव करून त्यांना अपमानीत केले होते. या अपमानाचा बदला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत. राज्यातील महायुती सरकारने लंडन येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहिर केले.
इंदू मिल येथे स्मारक उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे महायुती सरकारच आंबेडकरी चळवळीला न्याय मिळऊन देऊ शकते, ही भूमिका पटल्यामुळेच महायुती बरोबर जाऊन काम करण्याचा निर्णय प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
या प्रसंगी संपर्क प्रमुख नितीन कसबेकर, जिल्हा सरचिटणीस महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, जेष्ठ नेते सुरेश भिगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड, सांरग पटेकर, शाहिद शेख, संजय साळवे, शहर अध्यक्ष किरण जाधव, महेंद्र साळवे, विलास गजभिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.