Ahmednagar News: आज मंगळवारी खा.सुजय विखे आणि आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत जामखेड तालुका भाजप पदाधिकर्यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीनंतर राम शिंदे यांनी आज झालेल्या प्रचार नियोजन बैठकीचा आढावा सांगितला. नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, यावेळी कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली तसेच निवडणुकीच्या दृष्टीने कशी व्युव्ह रचना हवी याबद्दल सांगितले. गेल्या पाच वर्षातील एकूण आलेल्या अनुभवांचा उहापोह करण्यात आला. या बद्दल उमेदवार सुजय विखे यांनी सर्वांचे समाधान होईल अशी भूमिका मांडली.
यावर उपस्थितीत पदाधिकारी यांचे पूर्ण समाधान झाले असून यापूर्वी जामखेड तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यपेक्षा अधिकचे मताधिक्य जामखेड तालुक्यातून दिले जाईल अशी ग्वाही सर्वांनी दिली.
पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पार चा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे.
नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्या बुधवारी कर्जत तालुका भाजप पदाधिकारी यांची प्रचार नियोजनाची बैठक होणार आहे.
आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता,याची जाहीर वाच्यता होत नसते. आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे, असे उत्तर खा.सुजय विखे यांनी शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नावर दिली. मधल्या काळात कार्यकर्त्यांत जी भावना होती ती बैठकीत मांडली गेली. त्यावर सर्वांचे समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आहे.
आता एकजुटीने जेष्ठनेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती विखे यांनी दिली. यावेळी जामखेड तालुका भाजप पदाधिकारी उपस्थित होते.