Dnamarathi.com

Ahmednagar News: अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ एम.ए. बरालिया यांचे न्यायालयाने आरोपी विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना नुकताच तीनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे.

याबाबत हकीकत अशी की, सन २०१८ मध्ये डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे डॉ. विनोद श्रीखंडे यांचे तक्रारीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे एमस् हॉस्पीटल उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये वरील तीनही व्यक्तींच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे करुन त्यांचे बनावट कागदपत्रे, बनावट सह्या करुन सदरचे कर्ज प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बैंक अधिकारी व संचालक यांचेशी संगनमत करुन आरोपी डॉ. निलेश शेळके यांनी प्रत्येकी रु. ५ कोटी ७५ लाख असे एकुण रु. १६ कोटी पेक्षा जास्त रकमेचा अपहार केलेबाबतच्या तीन वेगवेगळ्या स्वतंत्र तक्रारी दाखल झालेल्या होत्या.

 त्या प्रकरणात तपासादरम्यान सर्व हिशोब व कागदपत्रे ही वैधानिक लेखापरिक्षणास पाठविण्यात आली होती, त्याचा अहवाल सन २०२१ मध्ये प्राप्त झाला होता. त्या अहवालानुसार व दाखल तक्रारीनुसार प्रकरणामध्ये आरोपी निलेश शेळके यांचे कायदेशीर सल्लागार व सी.ए. विजय विष्णुप्रसाद मर्दा यांचा सहभाग आढळून आलेला होता व प्रकरणात ते फिर्यादी पक्ष व आरोपी पक्ष यांचे वतीने त्यांनी सी.ए. म्हणून काम केलेले होते. 

त्याद्वारे मुख्य आरोपी निलेश शेळके यांचेशी संधान बांधुन फिर्यादी यांना फसविण्याचे उद्देशाने विजय मर्दा यांनी गुन्हा केला असल्याचे तपासात आढळून आल्याचा आरोप त्यांचेवर फिर्यादी पक्ष व पोलीसांनी केलेला होता. त्यानुसार त्यांना दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अंदाजे दीड महिना विजय मर्दा हे वरील तीनही स्वतंत्र प्रकरणामध्ये कारागृहामध्ये होते.

त्यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर करुन प्रकरणात आरोपी विजय मर्दा यांचा सहभाग हा केवळ अनुमानावरुन काढलेला आहे व त्यास प्रथमदर्शनी समर्पक असा पुरावा दिसून येत नाही, अपहाराची कोणतीही रक्कम हस्तेपर हस्ते आरोपी विजय मर्दा यांना आल्याचे आढळून येत नाही. त्याचप्रमाणे दाखल गुन्ह्यामधील लावण्यात आलेली कलमे ही विजय मर्दा यांना लागू होत नाहीत.

व त्यांनी त्यांचे कार्य हे कायदेशीर सल्लागार व सी.ए. या कार्यकक्षेत केलेले असल्याने त्यास प्रथमदर्शनी फसवणूक अपहार किंवा बनावट दस्त तयार करण्याचे व्याख्येमध्ये घेता येणार नाही अशा स्वरुपाचा युक्तीवाद ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयासमोर केला. सरकारपक्षाद्वारे त्यांची शहर बँकेसह नगर अर्बन बँकेच्या झालेल्या अपहारात सहभाग असल्याचा युक्तीवाद करण्यात आलेला होता. 

वरील कायदेशीर बाजु, उपलब्ध पुरावा व सादर करण्यात आलेला युक्तीवाद या सर्वांचे अवलोकन करुन जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी सी.ए. विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना वरील तिनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे.

आरोपीतर्फे ॲड. सतिश गुगळे व ॲड. अरविंद काकाणी यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *