Dnamarathi.com

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उंच भरारी घेण्यासाठी गरुड (बाज) बनावे लागेल, धोकेबाज बनून चालणार नाही, आताच समुद्र पार केलाय, अजून अवकाश बाकी आहे अशा पंक्तींमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले. वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये आयोजित मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सरकारने मुंबई आणि राज्यात केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जा. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे. विधानसभेत एक झटका दिलाय आणि मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्याना केले. शिवसेना वाढवायची आहे.

कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक वॉर्डात मतदार यादीतील 123 नावे सदस्य म्हणून नोंदवायची तसेच प्रत्येक वॉर्डात 10 हजारांहून अधिक सदस्यांची नोंदणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी उबाठा गटाचे विलेपार्ले उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे, युवती सेनेच्या अजिता जनावळे, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, हनी सबलो, शरद पवार गटाचे मुंबई सचिव सतीश नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ते पुढे म्हणाले की, निवडणुका आल्या की मुंबई तोडणार अशी भाषा काहीजण करतात पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर कोणीही मुंबई आपल्यापासून तोडू शकत नाही. सरकार रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देणार आहे आणि बाहेर फेकलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणणार असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रीत, एमआयडीसी अशा सर्व विभागांना एकत्र करुन ठाण्याप्रमाणेच मुंबईतही क्लस्टरच्या माध्यमातून विकास सुरु केला आहे. आपल्या सरकारने मुंबईत 7 एसटीपी केले. येत्या तीन चार वर्षात समुद्रात जाणारे काळे पाणी प्रक्रिया करुन सोडले जाईल आणि मुंबईच्या समुद्राचे पाणी निळेशार होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्ते दोन टप्प्यात काँक्रीटचे होणार आहेत. मात्र मुंबईच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली काहीजणांनी आतापर्यंत 3500 कोटी खाल्ले, अशी टीका शिंदे यांनी उबाठावर केली. सरकारने राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु केले आहेत. मुंबईत 300 एकरचे सेंट्रल पार्क होणार आहे. मात्र काहींनी साट्यालोट्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घेण्याची हिंमत दाखवली नव्हती पण आपण रेसकोर्सची 120 एकर जागा मिळवली, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री असताना मी मुंबईचे रस्ते धुतले आणि प्रदूषण कमी केले पण तुम्ही मात्र इतकी वर्ष तिजोरीची सफाई केली अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली

विधानसभेत पहिल्याच भाषणा घोषणा केली होती महायुतीच्या 200 हून अधिक जागा निवडून आणू नाहीतर गावी शेती करायला जाईन. पण राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या जेष्ठांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोण हे निवडणुकीत दाखवून दिले. खोके खोके आरोप करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीत खोक्यांमध्ये बंद करुन टाकले. एकनाथ शिंदेवर विश्वास टाकला तर जीवाची बाजी लावतो. आम्ही खुर्चीसाठी नाही तर माणसे शोधतो. पदासाठी कधीही मागणी नाही केली किंवा कुठलीही तडजोड केली नाही, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हा उठाव केला.

धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण पाठिशी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत तर प्रापर्टी पाहिजे, असा टोला शिंदे यांनी उबाठाला लगावला.

ते पुढे म्हणाले की, या देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपल. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. तुम्ही सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. दिल्लीत राज्यप्रमुखांची बैठक घेतली तेव्हा त्यांनी एका राज्यप्रमुखाला फोन केला आणि म्हणाले मालकासोबत राहणार की नोकराबरोबर जाणार अशी तुम्ही तुलना केली. अशाने पक्ष कधीच वाढणार नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे.

शिवसेना बाळासाहेबांनी जीवापाड जपली. शिवसैनिकांना जपले म्हणून आपण बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे विचार जपले. राज्यात सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणले. उठावानंतर झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत येत आहे मात्र तुमच्याकडून का जात आहेत याचे आत्मपरिक्षण करा, असा सल्ला शिंदे यांनी दिला.

घटनाबाह्य किती बोलणार, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण या महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी मी जन्माला आलोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितले. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मला मिळाला. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाचा सत्कार केला. पण मला शिव्या देताना त्यांनी महादजी शिंदे यांच्या वशजांचा अपमान. साहित्यिकांचा अपमान आणि ज्यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले त्यांचाही अपमान केला. गरज सरो वैद्य मरो अशी तुमची वागणूक आहे, असे ते म्हणाले.

महायुतीत तिनही पक्ष काम करत आहेत. कोणतेही कोल्ड वॉर नाही तर विकास विरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात आमचे युद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अयोध्येत भव्य राममंदीर आणि काश्मिरमधील कलम 370 हटवायचे असे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केले पण सकाळ संध्याकाळ त्यांनाही तुम्ही शिव्या देताय. उठता बसता तुम्ही शिव्या देताय तुमची शिव्यासेना झालीय का असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *