Champions Trophy : दुबईमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल की नाही हे 24 फेब्रुवारी 2025 रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर अवलंबून आहे.
न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवून त्यांनी स्पर्धेची चांगली सुरुवात केली आणि सोमवारी बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करू इच्छिते. जर बांगलादेश संघ न्यूझीलंडला हरवण्यात यशस्वी झाला तर पाकिस्तानसाठी स्पर्धेचे दरवाजे उघडतील पण यानंतर भारताला न्यूझीलंडला हरवावे लागेल आणि पाकिस्तानला बांगलादेशला हरवावे लागेल.
पाकिस्तानसाठी समीकरणे
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (24 फेब्रुवारी 2025) सामना- बांगलादेशला जिंकणे आवश्यक आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (27 फेब्रुवारी, 2025)- पाकिस्तानला मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना (2 मार्च 2025)- भारताला जिंकावेच लागेल.
जर असं झालं तर बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे गुण 2 -2 असतील आणि प्रत्येक संघ 1-1 असा सामना जिंकेल आणि गट अ मधून उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ नेट रन रेटच्या आधारे निश्चित केला जाईल. नेट रन रेटच्या शर्यतीत आघाडी घेण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशला मोठ्या फरकाने हरवावे लागेल.