DNA मराठी

Pathardi Crime

img 20260527 wa0004

Pathardi Murder Case : पाथर्डीत पोलिसी दादागिरीचा कळस; मृत्यूला जबाबदार कोण?

Pathardi Murder Case: पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथे घडलेली घटना ही केवळ अपघातानंतरचा वाद नाही, तर पोलिसी व्यवस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या दादागिरीचे भयावह रूप आहे. एका सामान्य नागरिकाचा संशयास्पद मृत्यू झाला आणि संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ एका मृत्यूचा राहिलेला नाही, तर “पोलीस संरक्षण देतात की जीव घेतात?” हा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. मोटारसायकल अपघातानंतर संबंधित प्रकरणात पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बोलावून घेतल्याचे आरोप होत आहेत. नुकसानभरपाईच्या नावाखाली संबंधित व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच थांबले नाही, तर गंभीर जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक म्हणजे एवढ्या गंभीर घटनेत केवळ साधी एनसी दाखल करण्यात आली. हा प्रकार पाहता संपूर्ण प्रकरण “अपघात” म्हणून दाखवून विमा रक्कम उकळण्याचा किंवा सत्य दडपण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. जर पोलिसांच्या छत्रछायेखाली गुंड नागरिकांना मारहाण करत असतील आणि त्यातून एखाद्याचा मृत्यू होत असेल, तर ही घटना कायद्याचा नव्हे तर जंगलराजाचा पुरावा मानावा लागेल. कायद्याचे रक्षण करण्यासाठी नेमलेले काही अधिकारीच जर गुंडांसोबत हातमिळवणी करून सर्वसामान्यांना वेठीस धरत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना गणवेश घालण्याचा अधिकार तरी आहे का? या प्रकरणात आणखी गंभीर आरोप म्हणजे मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न. संबंधित पोलिस आणि त्यांच्या संपर्कातील गुंडांनी मृताच्या घरी जाऊन धमकावल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जर न्याय मागणाऱ्यांनाच गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत घातक संकेत आहेत. पाथर्डी तालुक्यात “प्रकरणे दडपण्यात पटाईत” अशी ओळख निर्माण झालेल्या संबंधित पोलीस निरीक्षकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. केवळ बदली नव्हे, तर संबंधित अधिकारी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त मागणी ग्रामस्थ करत आहेत. आज जर या घटनेवर पांघरूण घातले गेले, तर उद्या प्रत्येक सामान्य नागरिक पोलिस ठाण्याच्या दारात उभा राहताना घाबरेल. कारण गुन्हेगारांपेक्षा पोलीसच अधिक धोकादायक वाटू लागले, तर ती कोणत्याही समाजासाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरेल. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर पोलिस दलावरील उरलेला जनतेचा विश्वास टिकवण्याची अखेरची संधी आहे. अन्यथा “रक्षकच भक्षक झाले” ही भावना जनमानसात कायमची घर करून बसेल.

Pathardi Murder Case : पाथर्डीत पोलिसी दादागिरीचा कळस; मृत्यूला जबाबदार कोण? Read More »

pathardi

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी

Pathardi Crime : शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्टा दाखवत युवकास मारहाण करून दुचाकी व रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलिसांनी झडप घालत पाच आरोपींपैकी तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिर हबिब शेख (वय ३४, रा. माणिकदौंडी चौक) हे फ्लेक्स व्यवसाय करतात. त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री आपली यमाहा लिबोरो (क्र. एमएच-१६ डब्ल्यू ३३१९) घरासमोर उभी केली होती. २२ फेब्रुवारी रोजी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी बाहेर पडताच त्यांच्या दुचाकीजवळ पाच जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. शेख यांनी विचारणा केली असता तिघे जण दुचाकीची वायर तोडत असल्याचे आढळले. विरोध करताच दोघांनी त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी एका आरोपीने कमरेतील गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला व गप्प बस नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली. भीतीपोटी शेख खाली बसले असता त्यांच्या खिशातील ६५० रुपये हिसकावण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दुचाकी पळवून नेली, तर दोन जण पल्सरवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे,नारायण बडे,ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव,इजाज सय्यद,निलेश गुंड, संदीप बडे,संदीप नागरगोजे ,भगवान गरगडे, प्रल्हाद निळे या पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत अनिकेत शामवेल शिंदे वय २२ रा. शितलानगर देहूरोड पुणे याचे सह आणखी दोघा अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. एका सज्ञान आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वापरलेली पल्सरही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी Read More »

Crime 1

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Crime: पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीत दिलीप अश्रुबा आव्हाड (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून सुरू झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जांभळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद क्षणातच चांगल्या मारामारीत परिवर्तित झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तेजस सोमनाथ आव्हाड, विठठल भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड यांसह एकूण पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2023 साली दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एका व्यक्तीने गाव सोडले होते. शनिवारी तो पुन्हा गावात आल्यानंतर परिस्थिती ताणली गेली. रविवारी सकाळी दोन्ही गटातील पंधरा ते वीस जणांमध्ये तुफान बाचाबाची झाली आणि पुढे हाणामारीला सुरुवात झाली.भांडणात धारदार शस्त्रे, काठ्या, तसेच दगडांचा वापर झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरू, पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर व संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू Read More »