Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी
Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.
Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »


