DNA मराठी

BJP

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान मोदी महागाई नियंत्रण करता येत नसेल तर खूर्ची सोडा

Harshwardhan Sapkal: सत्तेत आल्यास पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा करणारे मागील १२ वर्षापासून सत्तेत असताना पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगमाला भिडलेल्या आहेत. मागील ११ दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवलेल्या आहेत. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारने तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. इंधन दरवाढीवर भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, इराण युद्धाचे नाव पुढे करून केलेली दरवाढ ही दिशाभूल करणारी आहे. गेल्या १२ वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने, पेट्रोलच्या किमती ३८ टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यावेळी तर इराण इस्त्राईलचे युद्ध नव्हते. पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार ठरतात हे सर्वांनाच माहित आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. पण मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल १०० च्या आसपास विकले जात होते. आतातर नरेंद्र मोदी सरकार इथेनॉलमिश्रित निकृष्ट दर्जाचे पेट्रोल ११० रुपये प्रति लिटर दराने विकत आहे. गेल्या १२ वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे आणि मागील चार पाच दिवसात केलेल्या चार रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, या कंपन्यांनी काही तासांतच बाजारातून १२,४०० कोटींची कमाई केली. ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकून केलेली आहे. काँग्रेस सरकारच्या वेळी १-२ रुपयांनी पेट्रोल दरवाढ झाली की भाजपाचे नेते रस्त्यावर उतरत बोंबा मारत होते, मग आता महागाईवर गप्प का, असा प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक आहे असा दावा भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. साठा असेल तर राज्यातील विविध भागात पेट्रोल पंपावर रांगा का लागल्या आहेत?, यावरील भाजपा नेत्यांचे उत्तरही अत्यंत हास्यास्पद आहे. पेट्रोल डिझेलचा साठा केल्याने टंचाई निर्माण होत आहे, असे अत्यंत बेजबाबदार व अत्यंत निर्लज्जपणाचे विधान भाजपाचे नेते करत आहेत. हे विधान जबाबदारीपासून पळ काढणारे व जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारे आहे. जनता मुर्ख नाही, हे भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आंदोलन करणार.. नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जनतेत तीव्र संताप आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी व जनतेची सुरु असलेली लूट थांबवावी या मागणीसाठी काँग्रेस पक्ष विविध विभाग, सेल व संघटनांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे.

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान मोदी महागाई नियंत्रण करता येत नसेल तर खूर्ची सोडा Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर मध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बालभवनच्या नूतन वास्तूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ; तसेच मूर्तिकला आणि चित्रकला दालने उभारण्यात आली आहेत. या वास्तूमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेची तीन सुसज्ज सभागृहे आहेत. एकाच वेळी ५०० विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दररोज ५०० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेनुसार महिन्याला सुमारे १० हजार, तर वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळू शकणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवनच्या संचालक नीता पाटील आणि सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे; तसेच कुलसचिव शशिकांत काकडे यांच्यात सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले. या करारामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Devendra Fadnavis: जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

Police

Ahilyanagar News : पाथर्डी प्रकरण, न्यायासाठी महिलाचे महिनोनमहिने पोलीस ठाण्यात चक्करा पण…

Ahilyanagar News : पाथर्डी पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावर घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही ती संपूर्ण यंत्रणेच्या संवेदनाहीनतेवर उभा राहिलेला कठोर प्रश्न आहे. न्याय मागण्यासाठी एका पीडित महिलेला महिनोनमहिने पोलीस ठाण्याचे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात, हीच बाब मुळात लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी आहे. त्यातही गँगरेपसारख्या गंभीर आरोपाची तक्रार नोंदवून घेण्यात झालेला विलंब आणि अखेर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलीस ठाण्यात आरोपींकडून दबाव टाकला जाणे, हे अधिक धक्कादायक आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या ठिकाणीच पीडितेला असुरक्षित वाटावे, इतकी परिस्थिती भयावह झाली असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? एका महिलेने आणि तिच्या मुलाने स्वतःवर पेट्रोल ओतण्याइतकी निराशा अनुभवली, याचा अर्थ व्यवस्थेने त्यांना पूर्णतः अपयशी ठरवले आहे. त्या झटापटीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू केवळ अपघात म्हणून नोंदवून चालणार नाही तो व्यवस्थेच्या ढिसाळपणाचा आणि निष्क्रियतेचा परिणाम आहे. या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील कथित बेजबाबदार कारभार. पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, अवैध धंदे, कथित कलेक्शन आणि राजकीय पाठबळाच्या आरोपांनी परिस्थिती अधिक गंभीर बनते. जर खरोखरच काही विशिष्ट कर्मचाऱ्यांची “कलेक्शन टीम” कार्यरत असेल, तर ती केवळ एका ठाण्याची समस्या नाही ती संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर आघात करणारी बाब आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा फुटेज उपलब्ध न होणे हा देखील गंभीर मुद्दा आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हे पारदर्शकतेचे प्रतीक असायला हवे. मात्र, महत्त्वाच्या केबिनमध्येच सीसीटीव्ही नसतील, तर संशय अधिक गडद होतो. विशेषतः अशा घटनेनंतर, पुरावे उपलब्ध नसणे ही बाब अधिक चिंताजनक ठरते. आज प्रश्न केवळ एका गुन्ह्याचा नाही; प्रश्न आहे न्यायप्रक्रियेवरील विश्वासाचा. पीडित महिलेला वेळेत न्याय मिळाला असता, तक्रार तत्काळ नोंदवली गेली असती आणि आरोपींना संरक्षण देण्याचा आभास निर्माण झाला नसता, तर कदाचित एका व्यक्तीचा जीव गेला नसता. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची केवळ चौकशी करून थांबता कामा नये. पाथर्डी पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कारभाराचे स्वतंत्र आणि निष्पक्ष ऑडिट झाले पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या पाहिजेत. कारण, जीव गेल्यानंतर दाखल होणारे गुन्हे आणि नंतर होणाऱ्या चौकशा या मृत व्यक्तीला परत आणू शकत नाहीत; पण वेळेत घेतलेली जबाबदारी भविष्यातील अशा दुर्घटना रोखू शकते.

Ahilyanagar News : पाथर्डी प्रकरण, न्यायासाठी महिलाचे महिनोनमहिने पोलीस ठाण्यात चक्करा पण… Read More »

img 20260525 wa0000

Cockroach Janata Party : तरुणांची किंमत फक्त झुरळांइतकी? व्यवस्थेचा खरा चेहरा उघडा!

Cockroach Janata Party : देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेतील एका मान्यवर व्यक्तीकडून आलेले शब्द कधी कधी न्यायापेक्षा अधिक बोचरे ठरतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना “झुरळांशी” केली, तेव्हा प्रश्न फक्त एका वक्तव्याचा उरला नाही तो व्यवस्थेच्या मानसिकतेचा आरसा बनला. बेरोजगारीच्या आगीत होरपळणाऱ्या तरुणांना झुरळ म्हणणे म्हणजे त्यांच्या संघर्षाची थट्टा करण्यासारखे आहे. आज देशात लाखो तरुण पदव्या घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. नोकरी नाही, उद्योग नाही, आणि भविष्याची खात्री नाही. पण सत्ताधाऱ्यांच्या भाषणात मात्र ‘अमृतकाल’ ओसंडून वाहतो. वास्तवात मात्र हा “अमृतकाल” काही घराण्यांसाठी सुवर्णकाळ आणि सामान्य तरुणांसाठी धुरकट उद्याची शिक्षा ठरत चालला आहे. राजकारणाने तरुणांना विचार देण्याऐवजी झेंडे दिले. रोजगार देण्याऐवजी घोषणा दिल्या. अभ्यासाऐवजी ट्रोलिंग शिकवले. आज प्रत्येक पक्षाकडे घोषणा आहेत, पण रोजगाराचा नकाशा नाही. हिंदू-मुस्लिम, जात-पात, मंदिर-मशीद या वादांत तरुणांना इतके गुंतवले गेले की त्यांच्या हातातून स्वतःचे भविष्यच निसटले. विडंबना अशी की, सत्ताधारी आपल्या मुलांचे भविष्य परदेशात सुरक्षित ठेवतात आणि सामान्य तरुणांना राष्ट्रवादाच्या नावाखाली रस्त्यावर उभे करतात. ज्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लंडन, अमेरिकेची विद्यापीठे तयार असतात, तेच नेते गावातील तरुणाला “धर्मासाठी लढ” असा सल्ला देतात. लढणारा मात्र बेरोजगार तरुणच असतो; जिंकणारे नेहमीच सत्ताधारी असतात. न्यायालयातील वक्तव्यावर संताप व्यक्त करणे सोपे आहे. पण प्रश्न इतकाच नाही की न्यायाधीशांनी काय म्हटले. प्रश्न असा आहे की, समाजाने स्वतःची किंमत इतकी कमी का होऊ दिली? राजकारण्यांना, व्यवस्थेला आणि सत्तेला सामान्य तरुण “झुरळ” वाटू लागतो, यामागे वर्षानुवर्षांची सामाजिक उदासीनता आहे. कारण झुरळ मेले किंवा जगले, घरमालकाच्या आयुष्यावर फारसा फरक पडत नाही; तसाच सामान्य माणूस सत्तेसाठी केवळ गर्दीचा आकडा बनला आहे. तरुणांनी कोणाचाही झेंडा हातात घेण्यापूर्वी स्वतःच्या घराकडे पाहिले पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टांचा विचार केला पाहिजे. आज जो तरुण घोषणा देत फिरतो, उद्या तोच पिता होणार आहे. त्याच्या मुलांच्या शिक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेणार? राजकीय नेते की त्यांची घोषणाबाजी? लोकशाहीत नागरिक हा “मतदार” असतो, “झुरळ” नाही. पण नागरिकाने स्वतःची किंमत ओळखली नाही, तर व्यवस्थाही त्याला तितक्याच तुच्छतेने पाहते. म्हणूनच आता वेळ आली आहे टाळ्या वाजवणारे हात थांबवून प्रश्न विचारण्याची. धर्माच्या, जातीच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन रोजगार, शिक्षण आणि सन्मान या मुद्द्यांवर उभे राहण्याची. अन्यथा, व्यवस्था बदलणार नाही; फक्त झुरळांचा रंग बदलत राहील.

Cockroach Janata Party : तरुणांची किंमत फक्त झुरळांइतकी? व्यवस्थेचा खरा चेहरा उघडा! Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: मतदार यादीत घोळ करणारे आगामी काळात जेलमध्ये जाणार

Harshwardhan Sapkal: भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक आज टिळक भवन, दादर येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात व नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरुदीप सप्पल, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खा. प्रणिती शिंदे, माजी मंत्री रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, खासदार शोभा बच्छाव, खासदार बळवंत वानखेडे, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार रविंद्र चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, प्रदेश काँग्रेसचे संघटन सरचिटणीस ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते खासदार, आमदार व BLA1 उपस्थित होते. मतदार यादीतील कथित गैरप्रकार, वोटचोरी आणि SIR संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदनाचा तसेच केरळचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल व सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने SIR मोहिमेबाबत सुरु केलेल्या मोहिमेच्या लोगोचे सर्व प्रमुख्य नेत्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बैठकीदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरुदीप सप्पल, सतेज ऊर्फ बंटी पाटील, आशुतोष शिर्के, निमिष साने यांनीही SIR मोहिमेच्या अनुषंगाने सादरीकरण आणि मार्गदर्शन केले. बूथस्तरावरील संघटन मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात राज्यभर जनजागृती मोहीम राबवून मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,सपकाळ यांनी सांगितले की, SIR मोहिमेअंतर्गत BLA-1 संदर्भातील विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली असून संपूर्ण राज्यात बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची टीम तसेच राज्यातील अनुभवी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी पडताळणी, हरकती व दुरुस्त्या यासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने SIR मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणेशी समन्वय साधून मतदार यादी पडताळणी मोहिमेला गती देण्याचे काम समितीमार्फत करण्यात येणार आहे. आगामी विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, “राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मित्रपक्षांशी सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, “पेट्रोल डिझेल टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ते गझनी झाले आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. जनतेला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे कोणतेही लक्ष नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना सपकाळ यांनी भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. भाजप मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर सर्व समाजघटकांना भाजप महायुती फसवत आहे. जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिलेले आश्वासन आणि त्यानंतर उधळलेला गुलाल महाराष्ट्राने पाहिला. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाबाबत सरकारने काय केले याचे उत्तर त्यांनी द्यावे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, प्रकाश मेहतांपासून तानाजी सावंतांपर्यंत या सरकारमध्ये शंभरहून अधिक घोटाळे झाले आहेत. मात्र सरकार स्वतःच्या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. निष्पक्ष आणि प्रामाणिक चौकशी झाली तर सरकारमध्ये सहभागी असलेले अनेकजण गजाआड जातील. वडेट्टीवार यांनी शेतकरी प्रश्नावर सरकारला धारेवर धरत म्हटले की, हे सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली रक्कम भरण्याची ताकद शेतकऱ्यांकडे राहिलेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असताना सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. ते पुढे म्हणाले, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली धार्मिक आणि जातीय विभाजन निर्माण करून देशाला लुटण्याचा उद्योग भाजपने सुरू केला आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे केले जात आहेत.

Harshwardhan Sapkal: मतदार यादीत घोळ करणारे आगामी काळात जेलमध्ये जाणार Read More »

Vijay Wadettiwar 1

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त

Vijay Wadettiwar: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपर फुटले त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थोडी जरी लाज आणि नैतिकता असती, तर त्यांनी आतापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला असता अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हीच मागणी केली असून, या संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात मोटेगावकर किंवा अमित देशमुख यांच्या जुन्या विधानाचा आधार घेऊन सरकार स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सरकार त्यांना जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट शासन निर्णय निघालेला नाही. राज्यात डिझेल-पेट्रोलचा निर्माण झालेला तुटवडा आणि आगामी काळात केवळ 25% खते उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्र्यांचे सांगणे चिंताजनक आहे. डिझेलअभावी शेतीची मशागत आणि नांगरणी कशी होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सिस्टमविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांचे X (ट्विटर) हँडल्स बंद करून सरकार आपली भीती लपवत आहे. तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यांपेक्षा रोजगार हवा आहे.पण सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जेव्हा तरुणांना कॉकरोच म्हणते, तेव्हा तरुणांच्या मनातील राग उफाळून येणे स्वाभाविक आहे. सरकारचा एकूण कारभार हा पूर्णपणे तरुण विरोधी असून तो राग आता व्यक्त होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त Read More »

cockroach janata party

Cockroach Janata Party : भाजपला मागे टाकत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने इंटरनेटवर रचला इतिहास; 4 दिवसात 9 दशलक्ष फॉलोअर्स

Cockroach Janata Party : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर Cockroach Janata Party (CJP) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षाने आता सोशल मीडियावर भाजपला मागे टाकत नवीन इतिहास रचला आहे. पक्षाने सोशल मीडिया मोहिमेने 90 लाखांहून अधिक (9 दशलक्ष) फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत या मोहिमेने जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय जनता पक्ष’ (BJP) लाही मागे टाकले आहे. अवघ्या चार दिवसांत भाजपला टाकले मागे 21 मे रोजीच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर (@bjp4india) सुमारे 87 लाख (8.7 दशलक्ष) फॉलोअर्स होते तर केवळ चार दिवस जुन्या असलेल्या ‘Cockroach Janata Party’ ने 90 लाखांचा (9 दशलक्ष) टप्पा केव्हाच ओलांडला आहे. सध्या या यादीत काँग्रेस पक्षाचे हँडल (@incindia) अव्वल स्थानी असून त्याचे सुमारे 1.32 कोटी (13.2 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत, तर ‘आम आदमी पक्षा’चे (AAP) सुमारे 19 लाख (1.9 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत. भाजपने आतापर्यंत 18000 हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत तर CJP ने केवळ 54 पोस्ट्सच्या माध्यमातूनच हा टप्पा गाठला आहे. डिजिटल विश्वात, अलीकडच्या काळातील सर्वात मोठी राजकीय मोहीम म्हणून या CJP चे कौतुक केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. या सोशल मीडिया खात्याच्या ‘बायो’मध्ये (Bio) स्वतःचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, हे “तरुणांचे, तरुणांनी चालवलेले आणि तरुणांसाठी असलेले एक राजकीय व्यासपीठ” आहे. हे व्यासपीठ केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून काम करत नाही तर देशातील तरुण वर्ग बेरोजगारी, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना (Paper leaks) आणि राजकीय उत्तरदायित्व यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आपला संताप व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करत आहे.

Cockroach Janata Party : भाजपला मागे टाकत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने इंटरनेटवर रचला इतिहास; 4 दिवसात 9 दशलक्ष फॉलोअर्स Read More »

img 20260519 wa0071

PM Modi: प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती की लोकशाहीची कसोटी?

PM Modi : नॉर्वेमधील एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाने भारतातील राजकारण, प्रसारमाध्यमांची स्वायत्तता आणि सत्तेची उत्तरदायित्वाची भावना या तिन्ही मुद्द्यांना नव्याने केंद्रस्थानी आणले आहे. “तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं कधी देतील?” हा नॉर्वेच्या पत्रकाराने विचारलेला प्रश्न केवळ एका व्यक्तीला उद्देशून नव्हता तो जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेला प्रश्न होता. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांची ताकद केवळ बहुमतावर मोजली जात नाही, तर टीका ऐकून घेण्याच्या आणि कठीण प्रश्नांना सामोरे जाण्याच्या क्षमतेवरही ठरते. त्यामुळेच पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला प्रतिप्रश्न, भावनिक राष्ट्रवाद किंवा ऐतिहासिक अभिमानाच्या चौकटीत अडकवण्यापेक्षा थेट उत्तर देणे अधिक अपेक्षित होते. भारताने योग दिला, शून्याचा शोध लावला, कोरोना काळात लस पुरवल्या या सर्व गोष्टी निःसंशय अभिमानास्पद आहेत मात्र मानवाधिकार आणि प्रसारमाध्यम स्वातंत्र्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे ते प्रत्यक्ष उत्तर ठरत नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकाराला संयम ठेवा असे सुनावत भारताची जागतिक प्रतिमा आणि योगदान मांडले. परंतु आधुनिक लोकशाहीत विश्वास हा केवळ ऐतिहासिक वारसा किंवा आंतरराष्ट्रीय मदतीवर उभा राहत नाही तो पारदर्शकतेवर उभा राहतो. पत्रकाराने उपस्थित केलेला प्रश्न अस्वस्थ करणारा असू शकतो, पण अस्वस्थ करणारे प्रश्न टाळणे ही कोणत्याही मजबूत लोकशाहीची खूण नसते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या थेट प्रश्नांना क्वचितच सामोरे जातात, ही टीका पुन्हा ऐरणीवर आली आहे. गेल्या काही वर्षांत संवादाचे स्वरूप नियंत्रित मुलाखती, निवडक माध्यमांशी संभाषण किंवा थेट जनसंवाद अशा चौकटीत अधिक दिसले. कठोर, अनपेक्षित आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांसमोर उभे राहणे ही परिपक्व लोकशाहीतील नेतृत्वाची आवश्यक कसोटी मानली जाते. जगातील अनेक प्रबळ राष्ट्रांचे नेते नियमित पत्रकार परिषदांना सामोरे जातात.त्यामुळे भारतातही ही अपेक्षा अस्वाभाविक नाही. या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे भारतीय माध्यमांची भूमिका. नॉर्वेच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नानंतर अनेकांनी भारतीय माध्यमांवरच प्रश्न उपस्थित केले. सत्तेला प्रश्न विचारण्याची धार कमी होत चालल्याची टीका नवीन नाही. माध्यमांचे काम सरकारविरोध करणे नसते परंतु सत्तेला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे हीच लोकशाहीतील त्यांची मूलभूत जबाबदारी असते. भारताची प्रतिमा आज जगभर वेगाने उंचावत आहे. अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, तंत्रज्ञान आणि भू-राजकीय प्रभाव या सर्व क्षेत्रांत भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु जागतिक नेतृत्वाचा दावा करणाऱ्या देशाने टीका आणि प्रश्नांनाही तितक्याच आत्मविश्वासाने सामोरे जाणे अपेक्षित असते. कारण प्रश्न टाळल्याने प्रतिमा मजबूत होत नाही उलट संशय अधिक गडद होतो. लोकशाहीची खरी ताकद जयघोषात नसते, तर प्रश्न विचारण्याच्या आणि उत्तर देण्याच्या स्वातंत्र्यात असते. आणि सत्तेला प्रश्न विचारणारा पत्रकार हा राष्ट्रविरोधी नसतो तो लोकशाहीच्या आरशात वास्तव दाखवणारा नागरिक असतो.

PM Modi: प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती की लोकशाहीची कसोटी? Read More »

img 20260519 wa0072

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आणि चार वर्षांपासून गोठलेले राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. ही केवळ एक निवडणूक नाही तर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय शक्तिसंतुलनाची पहिली मोठी चाचणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा आता भाजपच्या वाढलेल्या संख्याबळामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हा खरा कुतूहलाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने आणि अनेक संस्था अस्तित्वात नसल्याने ही जागा तब्बल चार वर्षे रिक्त राहिली. तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, यामागे राजकीय अंकगणित स्पष्ट दिसते. ५५९ पैकी ९६ जागा रिक्त असल्या, तरी उर्वरित मतदाररचना भाजपसाठी अनुकूल असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने मागील काही वर्षांत निर्माण केलेले वर्चस्व आता विधान परिषद निवडणुकीत कसोटीवर लागणार आहे. नगर जिल्ह्याच्या या मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रंगतदार राहिला आहे. एका मताने दिग्गजांचा पराभव, मिठाईच्या बॉक्समधून उमेदवारीची चाहूल, मतदारांच्या ‘भावा’भोवती फिरणारे राजकारण या साऱ्यांनी या निवडणुकीला नेहमीच वेगळे स्थान मिळवून दिले. मर्यादित मतदारसंख्या असल्यामुळे येथे राजकीय गणिताइतकेच वैयक्तिक संबंध आणि स्थानिक प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच ही निवडणूक पक्षनिष्ठेपेक्षा सत्तासमीकरणांची अधिक असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपकडे जिल्ह्यात स्पष्ट संख्याबळ आहे. त्यामुळे “ही जागा भाजपलाच मिळावी” असा सूर पक्षातील निष्ठावंतांकडून उमटू लागला आहे. महायुतीतील जागावाटपात भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. तर राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांचे नावही चर्चेत आहे. तनपुरे यांनी घेतलेली ‘मवाळ’ भूमिका आणि त्याबदल्यात मिळालेल्या आश्वासनांच्या चर्चा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतील. ते भाजपकडे झुकतात की अजित पवार गटाकडे, यावर अनेक समीकरणे बदलू शकतात. महाविकास आघाडीच्या दृष्टीने मात्र ही निवडणूक आव्हानात्मक आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने विजयासाठी त्यांना केवळ राजकीय चातुर्य आणि मतविभाजनावर अवलंबून राहावे लागेल. अशा वेळी ‘क्रॉस वोटिंग’ आणि अंतर्गत नाराजी हे घटक निर्णायक ठरू शकतात. नगर जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक केवळ एक जागा भरणारी प्रक्रिया नाही; तर आगामी जिल्हा परिषद, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. भाजपला आपले वर्चस्व अधिक मजबूत करायचे आहे, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत नगरचे राजकारण अधिक चुरशीचे, अधिक वैयक्तिक आणि अधिक अनपेक्षित वळणे घेणार, हे निश्चित.

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल Read More »

iea report

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली

IEA Report: वाढता जागतिक तणाव आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटाचा परिणाम देशात आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर जाणवू लागला आहे. तेलाच्या साठ्यांबाबत एक गंभीर इशारा देताना, ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने’ (IEA) असे नमूद केले आहे की, जगातील व्यावसायिक तेलाचे साठे वेगाने कमी होत आहेत. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, अनेक देशांकडे आता केवळ काही आठवडे पुरेल इतकाच तेलाचा साठा शिल्लक आहे. दरम्यान, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून, या प्रवृत्तीमुळे जनतेची चिंता अधिकच वाढली आहे. पॅरिसमध्ये आयोजित G-7 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान बोलताना, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिरोल यांनी सांगितले की, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) भागात वाढलेला तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीचा जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. बिरोल यांच्या मते, परिस्थिती स्थिर करण्याच्या उद्देशाने दररोज आपत्कालीन साठ्यांमधून (emergency reserves) सुमारे 25 लाख बॅरल्स तेल बाजारात सोडले जात आहे. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की हे साठे अमर्याद नाहीत जर हे संकट दीर्घकाळापर्यंत कायम राहिले, तर जगाला गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. दोन महिन्यांत तेलाचे साठे विक्रमी नीचांकी पातळीवर संस्थेच्या अहवालानुसार, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये जागतिक तेलाच्या साठ्यांमध्ये मोठी घट नोंदवली गेली. अवघ्या दोन महिन्यांतच तेलाचे साठे सुमारे 24 कोटी 60 लाख बॅरल्सने कमी झाले आहेत. तज्ञांचे असे मानणे आहे की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे, नजीकच्या भविष्यात तेलाची मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत आणखी वाढू शकते. परिस्थितीमध्ये लवकर सुधारणा न झाल्यास, तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा IEA ने यापूर्वीच दिला होता. भारताकडे तेलाचा किती साठा उपलब्ध? तेलाच्या संकटाबाबत वाढत्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी नुकतेच असे आश्वासन दिले की, भारताकडे सध्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सरकारच्या माहितीनुसार, देशाकडे कच्च्या तेलाचा (crude oil) सुरक्षित साठा उपलब्ध असून तो सुमारे 60 दिवस पुरेल इतका आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 60 दिवस पुरेल इतका LNG (द्रवरूप नैसर्गिक वायू) आणि 45 दिवस पुरेल इतका LPG (द्रवरूप पेट्रोलियम वायू) यांचा साठाही उपलब्ध आहे. सरकारने हे देखील मान्य केले आहे की, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने उच्च पातळीवर राहिल्या, तर त्याचा सरकारी तेल कंपन्यांवर प्रचंड आर्थिक दबाव येऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ मंगळवारी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली. एकाच आठवड्यात तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये, पेट्रोलचा दर वाढून तो अंदाजे ₹98.64 प्रति लिटर झाला आहे तर डिझेलही महाग होऊन ₹91.58 प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही इंधनाच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. कोलकातामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली, जिथे पेट्रोलचे दर ₹110 प्रति लिटरच्या जवळ पोहोचले आहेत आणि डिझेलचा दर ₹96.07 प्रति लिटर झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर आता ₹107.59 प्रति लिटर आणि डिझेलचा दर ₹94.08 प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹104.49 प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर ₹96.11 प्रति लिटर इतका आहे.

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली Read More »