Dnamarathi.com

Sujay Vikhe News: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडे मधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोनही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत. मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. 

राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी खासदार सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील नागरिकांना साखर व हरभरा डाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ज्या गतीने कामे मार्गी लागली ती कामे विरोधी पक्षाकडे तीन वर्ष सत्ता असूनही लागली नाहीत असे मत यावेळी सुजय विखेंनी मांडले. 

तसेच पुढे ते म्हणाले की, साखर व हरभरा डाळ वाटणे ही शासनाची योजना नसून येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने हे वाटप केले जात आहे असे त्यांनी सांगितले. हा आपल्यासाठी एक प्रकारे मोठा सण असून या निमित्ताने साखर व डाळीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबीयांनी लाडू बनवून श्री रामांना वहावे व श्रीरामांची पूजा करावी आणि त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवावा हा उद्देश यामागे असून आपल्यासाठी ही दुसरी दिवाळी आहे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले. 

तरी अतिशय शुद्ध हेतूने सदरील उपक्रम राबविण्यात येत असून विरोधकांनी यावर कसलेही राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच पुढे त्यांनी निळवंडे संदर्भात भाष्य केले. विखे घराणे निळवंडेचे पाणी येऊन देणार नाही अशी वल्गना नेहमी विरोधकांनी करून घाणेरडे राजकारण केले, मात्र आम्ही सर्व सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. यासाठी आमच्या शासनाने सर्वाधिक निधी मंजूर केला आणि विखे घराण्याचे पालकमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निळवंडे ला पाणी सोडण्यात आले असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, येत्या 22 तारखेला निळवंडे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील. तो अधिकार त्यांचा आहे. तसेच कनगरच्या वर्ग दोनच्या जमिनीचा प्रश्न देखील अगदी कमी कालावधीमध्ये मार्गी लावला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले व सत्तेचा वापर हा केवळ जनकल्याणासाठीच केला जाईल. विखे घराने जे काम हाती घेतले ते पूर्णत्वास जातेच त्यामुळे कुणीही काळजी करू नये असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत असून विकासक दृष्टी ठेवणारे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत असे प्रतिपादन केले. 

तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधकांची सत्ता असल्यावर कोणतीही विकासकामे करण्यात आली नाही. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यात आला असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

 विद्युत खाते असताना देखील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज न देऊ शकणाऱ्यांनी इतरांवर आरोप करणे थांबवावे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात हे कुठपर्यंत योग्य आहे, असा सवाल विचारून येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

तसेच 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त जनतेला द्यावे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावासंदर्भातील वन खात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार असून प्रत्येकाच्या शेताला पाणी देखील मिळणार आहे.

 निळवंडेच्या माध्यमातून परिसरातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून मिळतील याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे असे त्यांनी सांगितले. तसेच निळवंडे बाबत आमचे योगदान नाही असे म्हणणाऱ्यांनी आम्ही निळवंडे साठी काय काय केले हे तपासले पाहिजे. तुम्ही घरी बसून बाता मारता, मात्र आम्ही प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करतो. तुमचे 50 वर्षांमध्ये निळवंडेसाठी योगदान काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विरोधकांना विचारला.

या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश दादा बनकर, संदीप गिते, विजय कानडे, दिपक वाबळे, अमोल भनगडे, दादा पाटील हारदे, मयूर हारदे, विजय बलमे, सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाळासाहेब गाढे, बाबासाहेब गाढे, संदीप घाडगे, महमद भाई इनामदार, दत्तू गाढे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय गाढे, भगवान घाडगे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे, राजेद्र दिवे, शंकर राव जाधव, यशवंतराव जाधव, तुषार गाढे, दादासाहेब घाडगे, सुनील शेटे, गोविंदराव दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *