Stock Market : शेअर मार्केटच्या फसवणुकीतून सामान्य माणसांच्या पैसे बुडवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत व्यक्तीच्या नावावर मुंबईत खाते सुरू करून, त्या खात्यावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपी कवडे यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जवळपास एक कोटी रुपयांची लाच ऑनलाइन घेतली अशी माहिती आहे.
मयत व्यक्तीच्या नावाचे खाते त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीचे होते. पोलीसांनी बँकेतून ही रक्कम इतर ठिकाणी पाठवून, नंतर ती कॅश करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित पोलीसाची नियंत्रण कक्षात बदली झाली असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरत आहे.
शेवगाव-पाथर्डी परिसरात झालेल्या या घोटाळ्यात लोकांना जास्त परतावा मिळेल असे सांगून फसवले गेले. अंदाजे 1500 हजार ते 2000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यामुळे स्थानिक बाजारपेठेची परिस्थिती उध्वस्त झाली आहे.
मी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्या होत्या, तेव्हा परिस्थिती खूपच भयानक होती. काहींनी जमीन विकून पैसे गुंतवले, काहींनी तर बँकेतून कर्ज काढले तर यामध्ये मोल मजुरी करणाऱ्या महिलांनीही पैसे लावलेले आहेत तर काही दोन्ही भांडे करणाऱ्या महिलांनी मुलांसाठी ठेवलेली रक्कमही या ठिकाणी गुंतवली आहे, काहींनी कुटुंबाचे राखीव पैसे घालून शेअरमध्ये गुंतवले, तर काहींनी मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे पण वापरले. अनेक कुटुंबांना आज आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
घोटाळ्याच्या काळात पोलीस केस न घेता पाहत राहिले, अक्षरशः लोंढेच्या लोंढे लोक पोलीस ठाण्यात येत होते, पण पोलीस का गप्प होते, हे उत्तर मला जवळपास वर्षभरांनी कळले.
एकीकडे सामान्य कुटुंब संपत चालले आहेत, तर दुसरीकडे त्याच प्रकरणात पोलीस कोट्यावधी रुपयांची लाच घेत आहेत. स्थानिक नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे “काय होणार यावर? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?”
स्थानिक कार्यकर्ते देखील ठाम आहेत. ते म्हणतात, “फक्त नियंत्रण कक्षात बदली करून काय होणार? अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे!” असा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे.
शेवगाव-पाथर्डीतील शेअर मार्केट घोटाळा प्रकरण आता केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक आणी पोलीस प्रशासनाच्या जवाबदारीचा सत्यपरिक्षण बनले आहे.