अहिल्यानगर :
Sawedi land scam – जमिनीच्या वादातून बनावट दस्तऐवज तयार करून संपत्तीवर बेकायदेशीर मालकी हक्क सांगण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्ह्यातील खराडी येथील रहिवासी कासम अब्दुल अजीज यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या भावाच्या नावाने दिनांक 07 जून 1991 रोजी बनावट अर्ज व दस्तऐवज तयार करून नोंदणी कार्यालयात दाखल करण्यात आला. संबंधित नोंद 2154/32 या क्रमांकाखाली दाखल असून, त्यावर मृत व्यक्तीच्या नावाची सही करण्यात आल्याचे आढळते. मात्र, त्या तारखेला संबंधित व्यक्तीचे निधन झालेले असल्याने अशी सही करणे शक्यच नसल्याचे अर्जदारांनी स्पष्ट केले आहे.
अर्जदारांच्या मते, मृत व्यक्तीच्या नावाने दस्तऐवज तयार होणे हे केवळ गंभीर गैरप्रकार नसून, शासकीय यंत्रणेतील काहींच्या संमतीशिवाय अशा प्रकाराला मूळच मिळणे अशक्य आहे. त्यामुळे बनावट दस्तऐवज तयार करणारे, त्यांना पाठबळ देणारे तसेच या प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांवर फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, जमीन हडपण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दस्तऐवजांच्या सत्यतेची तपासणी करून दोषींना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असेही तक्रारदारांनी नमूद केले आहे.