Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला.
ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे.
महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.