Pune Porsche Car Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचा समावेश आहे. या प्रकरणी त्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही, अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही, असे आरोप त्यांच्यावर आहेत. या अपघातावेळी दोन्ही पोलीस येरवडा पोलीस ठाण्यात हजर होते. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला या पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
प्रकरण काय आहे?
पुण्यात रविवारी रात्री 2.15 च्या सुमारास एका अल्पवयीन आरोपीने दोन आयटी व्यावसायिकांना पोर्श कारने धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघेही दुचाकीवरून जात होते. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत. त्याचवेळी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आरोपी पबमध्ये पार्टी करण्यासाठी आले होते. पुण्यातील दोन पबमध्ये त्याने आपल्या मित्रांसोबत दारू प्यायली, त्यानंतर तेथून निघताना त्याची पोर्श गाडी सुसाट वेगाने चालवली. यावेळी हा अपघात झाला होता.