Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूमिसंपादनाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे.
या रेल्वे मार्गासाठी तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, आदी गावांतील अत्यंत सुपीक शेतीजमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील बहुतांश शेतजमीन नदीकाठालगत असून कालव्यांद्वारे नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या जमिनींवर मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते.
रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या भूमिसंपादनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या भावना राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचवून भूमिसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला, ज्यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






