Rais Sheikh on Nitesh Rane : पहलगाम हल्ल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यानंतर धर्म विचारून दुकानातून वस्तू खरेदी करा असा सल्ला हिंदूंना दिल्याने त्यांच्यावर चारही बाजूने टीका होत आहे. तर दुसरीकडे आता समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पर्यटकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेला आदील कोण होता? असा प्रश्न नितेश राणे यांना विचारला आहे.
दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा आणि त्याच्या धर्माविषयी संशय आल्यास हनुमान चालीसा म्हणायला लावा असं नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना म्हटले आहे.
तर आता राज्याचे मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे धार्मिक व्देष पसरवत आहेत. कश्मीरमध्ये पर्यटकांना वाचवताना अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मृत्युमुखी पडलेला सय्यद आदील कोण होता, हे राणे यांनी सांगावे, असे आव्हान समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी दिले आहे.
मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी, 26 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सभेत सदर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याला उत्तर देताना आमदार रईस शेख म्हणाले की, पहलगाम खोऱ्यात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर केलेला गोळीबार निंदनीय आहे. देशातील एकही मुसलमान अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्याचे समर्थन करत नाही. याप्रकरणी पाकिस्तानविरोधात केलेल्या भारताच्या कृतीला मुसलमानांचा पाठिंबाच आहे.
मात्र पर्यटकांना वाचवताना अतिरेक्यांशी दोन हात करताना मृत्युमुखी पडलेला सय्यद आदील हुसेन शहा हा स्थानिक मुस्लीम होता. 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पर्यंटकांना स्थानिकांनी मोफत टॅक्सी, मोफत अन्न आणि मोफत निवासाची साेय उपलब्ध करुन दिली. हे सर्व स्थानिक मुस्लीम आहेत. जम्मू-कश्मीरच्या प्रत्येक मशिदीमध्ये, दर्ग्यामध्ये मयत पर्यटकांसाठी दुआ केली जात आहे. याविषयी मंत्री नितेश राणे का बोलत नाहीत, असा सवाल आमदार रईस शेख यांनी केला.
ते पुढे म्हणाले, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पाकिस्तान प्रमाणे आम्ही धर्माच्या आधारावर देश चालवत नाही. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य तितकेच निंदनीय आहे. धर्माचे राजकारण करणे हा नितेश राणे यांचा धंदा बनला आहे. मांस खरेदी संदर्भातही राणे यांनी हलाल पद्धतीसंदर्भात केलेल्या वक्तव्याला कोणी गांभीर्याने घेतले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्र उभे करण्याचे काम करत असताना त्यांच्या भाजपचे मंत्री असलेले नितेश राणे देश तोडण्याचे काम करत आहेत, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला.
बेताल धार्मिक वक्तव्य केल्याने कोणी धर्माचा कैवारी होत नसतो, नेता होत नसतो. भारतामध्ये धार्मिक राजकारणाला अजिबात थारा नाही. मंत्रीपदाची शपथ राणे हे विसरलेले आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांना त्यांच्या पक्षातूनही समर्थन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची व्याख्याने मंत्री राणे यांनी मुळातून ऐकावीत, असा सल्ला आमदार रईस शेख यांनी दिला आहे.