पवारांच्या राष्ट्रवादीत नवा अध्यक्ष ? या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक नवा पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या. मात्र, या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे. “ही केवळ खोडसाळपणाची अफवा आहे,” असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
शनिवारी संध्याकाळनंतर विविध माध्यमांवर जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची माहिती झपाट्याने पसरू लागली. अनेकांनी या घडामोडींचा अर्थ पक्षातील अंतर्गत उलथापालथ म्हणून लावायला सुरुवात केली. मात्र, आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले की, “जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहणार. त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा त्या-त्या मंडळींनी स्वतःसाठी तयार केलेल्या आहेत. पक्षात अशा पद्धतीने निर्णय घेतले जात नाहीत.”
दरम्यान, जयंत पाटील यांनी यापूर्वीच (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सूचक विधान केले होते – “नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे.” यामुळेच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळकटी मिळाली. मात्र, अधिकृतरीत्या त्यांनी कोणताही लेखी राजीनामा दिलेला नाही, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. ते नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार, १५ जुलैला या संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राजकीय निरीक्षकांचे मत
या चर्चांमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे का, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गटाच्या तुलनेत आपला पक्ष अधिक तरुण, लढाऊ आणि परिवर्तनशील आहे, हे दाखवण्यासाठी शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांचा मार्ग वेगळा आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होतो.
राजीनामा झाला की नाही, याचा निर्णय अधिकृतपणे होईपर्यंत जयंत पाटील यांच्या पुढील वाटचालीकडे राज्यातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार, पाटीलच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचे नेतृत्व अखेर शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच ठरणार आहे, हे स्पष्ट दिसते.