DNA मराठी

Raigad Police : नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाण्याच्या टँकरमधून सुरू असलेली दारू तस्करी उधळली

raigad police

Raigad Police : रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. पाण्याच्या टँकरच्या आडून सुरू असलेली ही तस्करी उघडकीस आली असून पोलिसांनी टँकरसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वारोटे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कर्जत–मुरबाड मार्गावरील वारे गाव परिसरात सापळा रचला. कोकण किनारा हॉटेलसमोर संशयित टँकर अडवून तपासणी केली असता या टँकरमध्ये अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

राजस्थानमधील गुडामबेरी येथील रहिवासी लाडूराम खियाराम बिश्नोई हा आरोपी ही दारू गोव्याहून गुजरातकडे नेत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, कोणालाही संशय येऊ नये म्हणून पाणी वाहून नेणाऱ्या टँकरचा वापर करण्यात आला होता. बाहेरून टँकर पाण्याचा असल्यासारखा दिसत असला तरी आतमध्ये गुप्त कप्पे तयार करून त्यामध्ये दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते.

तपासणीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त केली असून टँकरसह एकूण १ कोटी १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राहुल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत) यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *