NCP Second Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज आपली दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 38 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.
दुसऱ्या यादीमध्ये काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जीशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना नेते वरून सरदेसाई विरुद्ध जीशान सिद्दिकी असा सामना रंगणार आहे.
तर पक्षाकडून अनुशक्ती नगरमधून सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या जागी पक्षाने आता त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध इस्लामपूर मधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली आहे.
तसेच तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील असा सामना रंगणार आहे.
वडगाव शेरीमधून पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहमधून भाजपचे माजी खासदार प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.






