Navnath Ban : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप नेते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले की “उबाठा गटाच्या 52 पत्त्यांच्या गड्डीत सर्वच पत्ते जोकरचे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीवेळी म्हणाले होते ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’. मात्र जनतेने उद्धव ठाकरे यांना महाजोकर करून घरी बसवले आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. ही वस्तुस्थिती माकडछाप संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावी.”
ते पुढे म्हणाले की “देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत. त्यामुळेच तुम्हाला झळ बसत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत खरा महाजोकर तुम्ही आणि तुमचा गटच आहे, हे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.”
मुंबईतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नवनाथ बन म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. मातोश्री-2 कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. मृतावरच्या टाळुवरील लोणी खाणारे जर कोणी असतील तर ते स्वतः संजय राऊत आहेत.”
राऊतांच्या 2029 च्या कोकणातील भविष्यवाणीस उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले “2024 च्याच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. तुमच्या गटाला दोन्ही हातांनी बोंबा माराव्या लागल्या आणि जनता तुम्हाला घरी बसवून आली. 2029 ची वाट पाहू नका, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बुच लावतील.”
नारायण राणे यांच्याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत नवनाथ बन म्हणाले की, “नारायण राणे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरताना राऊत यांना थोडी लाज वाटली पाहिजे. नारायण राणे यांच्या कर्तृत्वामुळे शिवसेना उभी राहिली आणि आज तुम्ही अस्तित्वात आहात. त्यांच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करावा.”