Navi Mumbai Crime : हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या विकृताने एका विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पनवेल येथे राहणारी विद्यार्थीनि ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. यावेळी लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या शेख अख्तर नवाज शेख याला डब्यातील महिलांनी जाब विचारला. त्यावर संतप्त झालेल्या आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेता हिला धावत्या लोकलबाहेर ढकलले.
हा प्रकार पाहून डब्यातील महिलांनी घाबरून आरडाओरड करत तत्काळ लोकलची चेन खेचली. तसेच काही महिलांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचला. लोकल स्थानकात दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेख याला अटक केली.
या घटनेत श्वेता ही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला, कंबरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती विजय तायडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल रेल्वे पोलीस यांनी दिली.
तर दुसरीकडे या धक्कादायक घटनेनंतर लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






