Nandura Urban Bank : राज्यातील सहकारी बँकेत पुन्हा एकदा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अधिकाऱ्याला अटक देखील केली आहे.
नांदुरा अर्बन बँकेत एका अधिकाऱ्याने बँकेची 5 कोटी 45 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीसांनी तत्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन शर्मा असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. शर्मा याने बँकेतील
इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली. शर्मा याने बँकेतून मोठ्या प्रमाणात रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा अर्बन बँक ही बुलढाणा जिल्ह्यातील नावाजलेली सहकारी बँक आहे. या बँकेत कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आरोपी गजानन शर्मा याने बँकेत मोठा गंडा घातला. शर्मा यांनी बँकेचे कोट्यवधी रुपये दुसऱ्या बँकेच्या खात्यात वारंवार ट्रान्सफर केले.
बँकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे. बँकेच्या संचालकांना हा प्रकार कळताच त्यांनी त्यांच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी शर्माला अटक केली. आतापर्यंतच्या तपासात 5 कोटी 45 लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
दुसरीकडे ही घटना वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर ठेवीदारांना आपले पैसे गमावण्याची भीती वाटू लागली. बँकेत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बँक व्यवस्थापनाने ठेवीदारांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे.