DNA मराठी

Saif Ali Khan वर चाकूने हल्ला, खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न

Saif Ali Khan : जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत,
जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला नको का? अशी टीका काँगेस खासदार वर्षा गायकवाड यांनी अभिनेता सैफ अली खान प्रकरणावरून सरकारवर केली आहे. त्यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो.. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही.

कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे.

गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण?
कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे.

वाढत्या गोळीबाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणं, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचं राजकारण वाढणं या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय? असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *