Mangalprabhat Lodha : मुंबई मधील परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला.
यावेळी केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ हा उल्लेख वगळण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली. या वक्तव्यामुळे केईएमच्या नावाबाबत राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
लोढा म्हणाले, “हे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही इंग्रजांच्या पाऊलखुणा कायम आहेत. मुंबई महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा.” कार्यक्रमात त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठीही महत्त्वाच्या सूचना केल्या. नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा केंद्र, आरोग्य स्वयंसेवकांसाठी बैठक व्यवस्था, विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करणारे कम्युनिकेशन सेंटर उभारावे, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेत सक्रिय सहभागी करून घेणे, एनएसएस व एनसीसीच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांना मदत करणे, डॉक्टरांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर भर द्यावा. शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित स्मरणिका तयार करावी आणि कोविडसारख्या संकटातील केईएमच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण व्हावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या पुढील नियोजनाची माहिती दिली.
दरम्यान मंत्री लोढा यांच्या सूचनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र टीका केली. “नाव बदलल्याने संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. औषधांची कमतरता, आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणांची गरज किंवा रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलणे अपेक्षित होते. मात्र, यांचा व्यवसाय केवळ धर्माच्या मुद्द्यांपुरताच मर्यादित आहे. अशी भूमिका देशाला मागे घेऊन जाणारी आहे. अहमदाबादचे नाव आधी बदला,” असा उपरोधिक टोला सावंत यांनी लगावला.केईएमच्या काही डॉक्टर, माजी विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही या प्रस्तावाला विरोध होत असून, नाव बदलण्यापेक्षा रुग्णालयातील सुविधा, उपकरणे आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली जात आहे. शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही चर्चा पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.






