Maratha Reservation: गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सूरू केला आहे.
या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.
यासाठी आज संघटनेकडून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारी 2024 रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
सर्व सामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी.
तरी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे.