Sujay Vikhe: येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे.
यातच आता अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मला जर संधी मिळाली तर मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी दिली त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातसह राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर किंवा संगमनेरमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवल्याने सुजय विखे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये.
माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे असं माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले.
तर शिर्डी विधानसभा मतदार संघातून राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवणार असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट हेच आहे. पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आ.राम शिंदे यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. त्याच पध्दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्छा व्यक्त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्यात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्याचे सुचक वक्तव्य यांनी केले.