मुंबई | प्रतिनिधी
Maharashtra Politics – राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांच्या नैतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दोघा मंत्र्यांना दिलेल्या थेट व अप्रत्यक्ष समर्थनामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
राज्यातील दोन मंत्र्यांवर सध्या वादंग निर्माण झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांचा रोकड भरलेली बॅग असलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला असून, त्यांच्या खाजगी बेडरूममधील दृश्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवत तातडीने राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या मातोश्रींच्या नावावर वादग्रस्त डान्स बारचे परवाने असल्याची माहिती समोर आल्यानंतरही सरकारने या दोन्ही प्रकरणांवर केवळ तोंडी समज देऊन विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
रोकडबॅग प्रकरणातील शिरसाठ
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांचा रोकड भरलेली बॅग असलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला होता. बेडरूममधील दृश्यावरून विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु सरकारने या प्रकरणाला “खाजगी स्वरूपाचं” ठरवत केवळ तोंडी समज देऊन विषय संपवला.
बार परवाना प्रकरणातील कदम
दुसरीकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या मातोश्रींच्या नावावर कांडिवली परिसरातील एका वादग्रस्त डान्स बारचा परवाना असल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांच्या कारवाईनंतर परवाने परत घेण्यात आले असले, तरी या प्रकरणाने नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला. यावरही विरोधक आक्रमक झाले होते,
दिल्ली दौऱ्यानंतर निर्णय
या दोन्ही प्रकरणांमुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. शहा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच संबंधित मंत्र्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या भेटीचा व या प्रकरणांच्या हाताळणीचा संबंध असल्याचा संशय अधिकच बळावला आहे.
पक्षांतर्गत समज आणि इशारा
संपूर्ण गदारोळानंतर शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांना आणि आमदारांना बंद दरवाजामागील बैठकीत सुनावलं. “तुमचं वर्तन जनतेच्या अपेक्षांना धरून नसेल, तर बोट माझ्यावर येतं. जबाबदारीने वागा,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.
विरोधकांचा सवाल
या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते आणि इतर नेत्यांनी सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे. “सत्ताधाऱ्यांच्या रक्षणासाठी केंद्राचा वापर होत असल्याचं हे स्पष्ट उदाहरण,” अशी प्रतिक्रिया विरोधी नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणामुळे हे दोघेही मंत्री सध्या तरी मंत्रिपदावर कायम आहेत. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणांचा जनतेच्या मनावर काय परिणाम होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.