Maharashtra News : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे? याची कोणालाच कल्पना नाही.
तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना शरद पवार यांचे फोटो निवडणूक प्रचारामध्ये वापरल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढले आहेत.
शरद पवार यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विचारले की, वेगळे झाल्यानंतरही अजित पवार गट शरद पवारांचे फोटो का वापरत आहे?
निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांच्या फोटोचा वापर का? करत आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केला.
न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले की, आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात. तुम्ही त्यांच्यासोबत (शरद पवार) न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मग तुम्ही त्यांचे (शरद पवार) फोटो का वापरता… आता तुमची ओळख घेऊन निवडणुकीत जा…”
उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी आली आहे.
अजित पवार गट मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांच्या नावाचा, फोटोचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने करून याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला तेव्हा राष्ट्रवादीचे दोन गट झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला.
अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारीला अजित पवार गटाला राष्ट्रवादीचा दर्जा देत घड्याळाचे चिन्ह दिले.
तर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ आणि निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असे नाव देण्यात आले.