Maharashtra Election: विधानसभेची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे.
यातच समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीने बुधवारी 62 जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्क्रिनिंग कमिटीने पाठवलेल्या नावांमधून काँग्रेसचे सीईसी उमेदवाराच्या नावाला मंजुरी देतात.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीने रवींद्र चव्हाण यांचे पुत्र दिवंगत संतराव चव्हाण यांचे एकच नाव मंजूर केल्याचेही ते म्हणाले. वसंतराव चव्हाण यांचे यावर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले, त्यामुळे नांदेड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन येथे झालेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
बैठकीनंतर पटोले म्हणाले, “62 जागांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरला सीईसीची बैठक होणार आहे.” दुसरीकडे काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बीके हरिप्रसाद, गौरव गोगोई आणि मोहन मरकम यांची वरिष्ठ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.