Maharashtra Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार कोण असणार हे थोड्याच दिवसात समोर येणार आहे.
तर दुसरीकडे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर मतदारसंघातील बूथ, गण, गटनिहाय आढावा बैठका सुरु केलेल्या असून बैठकांचा धडाकाच लावला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पठारे यांनी वारंवार मातोश्री गाठत ठाकरेंच्या भेठीगाठी घेतल्या आहेत यामुळे पठारे यांनी विधानसभेचे जोरदार तयारी केली आहे.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात 366 बूथ, 14 गण, 7 गट असून पारनेर शहरातील नगरपंचायतचाही यात समावेश आहे. त्यादृष्टीने डॉ.श्रीकांत पठारे हे मातोश्रीवरील बैठकीवरुण आल्यापासून सातत्याने मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेत असून आता गण, गटनिहाय बैठकांचे सत्रच डॉ.श्रीकांत पठारे यांनी सुरु केले आहे.
मतदान घडवून आणण्यासाठी लागणारी शिवसैनिकांची फौज उभी करण्याचे काम यात सुरु असून महाविकासआघाडीतील सर्वच मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना डॉ.श्रीकांत पठारे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आहेत.