Dnamarathi.com

Maharashtra Dengue Case : राज्यात डेंग्यूचा उद्रेक होताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होत असल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. डेंग्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात नोंदवले गेले आहेत.


सर्वाधिक रुग्ण कुठे आहेत?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 2 लाख 34 हजार 427 डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यापैकी महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 17 हजार 531 इतकी आहे. तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक 33 हजार 75 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे, जिथे एकूण 19 हजार 672 रुग्ण आढळले आहेत.

मुंबईसह राज्यभरातील लोकांच्या आरोग्यावर डासजन्य आजारांचा मोठा परिणाम झाला आहे. आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार संपूर्ण देशाची तुलना केल्यास महाराष्ट्रात सात टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईत 4 हजार 300 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य विभागाने काही सूचना जारी केल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

4 वर्षातील सर्वाधिक प्रकरणे
आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 3 हजार 356 होती, तर 2021 मध्ये राज्यातील रुग्णांची संख्या 12 हजार 720 झाली. सन 2022 मध्ये राज्यात 8 हजार 578 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते, तर यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्यात एकूण 17 हजार 541 लोकांना या गंभीर आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *