Raigad News : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या आणि गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले यांच्यासह एकूण सात आरोपी अखेर आज महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.
कालच या प्रकरणात आरोपींना अटक न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला अक्षरशः धारेवर धरत, “मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला होता.
“अटक करायची असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते. मात्र अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्रे सादर केली जातात,” अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली.
याच सुनावणीत मुख्यमंत्री तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या, अशा स्पष्ट सूचनाही न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले यांचे पोलिस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले यांच्यासह इतर आरोपींवरही गुन्हे दाखल आहेत.






