Love Jihad Law : महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याच्या मसूद्यासाठी पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.
समितीची रचना आणि कार्य
या समितीमध्ये महिला व बालकल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे (विधी) सचिव हे सदस्य असतील. ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे.
राजकीय प्रतिक्रिया
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर मध्ये बोलताना या कायद्याचे स्वागत केले. ते म्हणाले, “राज्यामध्ये लव्ह जिहाद च्या विरोधामध्ये सक्षम कायदा आणला जात आहे, राज्य सरकारचा हा पाऊल स्वागत आहे. मात्र, पूर्णपणे ड्राफ्ट तयार झाल्यावर आणि त्यामध्ये काय आहे हे पाहिल्यावरच मी त्यावर प्रतिक्रिया देईल. आता तरी हा कायदा येत असल्यामुळे मी सरकारचा अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो.”
इतर राज्यांचा अनुभव
देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. जर महाराष्ट्रात हे कायदा लागू झाला तर
महाराष्ट्र हे दहावे राज्य असेल ज्या राज्यात असा कायदा असेल.
विविध संघटनांची मागणी
राज्यातील विविध हिंदू संघटनांनी आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनीही लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
भविष्यातील दृष्टिकोन
हा कायदा राज्यातील धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यात मदत करेल, असे आश्वासन राज्य सरकार तर्फे दिले जात आहे. समितीने कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी इतर राज्यातील कायद्याचा अभ्यास करण्यात येणार आहे, ज्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल.