Lok Sabha Election: राज्याच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजाविणारा जिल्हा म्हणुन अहमदनगरकडे पाहिले जाते. जिल्ह्यात आता रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी चांगले उद्योग यावे हाच प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.
निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुशंगाने पिंपळगाव लांडगा येथे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सध्या तरुणांसाठी जिल्ह्याला सर्वात मोठी समस्या रोजगारासाठी बाहेर जावे लागणे ही आहे. यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष ठेऊन मी पहिली निवडणुक लढविली होती. पण कोरोना काळ आणि हप्ता वसूली सरकार असल्याने फारसे प्रयत्न करता आले नाहीत. मात्र मागील दोन वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार आल्याने जिल्ह्यात औद्योगिक वसाहती उभारण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. वडगाव गुप्ता व शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळाल्याने तरुणांना रोजगार मिळणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे शासनाची ६१८ एकर जमीन विनामुल्य मिळवत औद्योगिक वसाहतीचा पाया रचला असून, लवकरच त्यांचे काम सुरू होईल. यामुळे जिह्यात अधिक रोजगार निर्मीती होऊन हजारो तरूणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना जिल्ह्यातच राहता येणार आहे. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्याने तरुणांचे मनोबल वाढणार आहे. याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला होणार असल्याचे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
उद्योग धद्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो रुपायाचा निधी मिळवत गावा गावातील रस्ते, महामार्ग, अशी दळण वळणाची साधने उभी केली. एन.एच.आय तर्फे ४ हजार २७७.५० कोटी रुपयांचा निधी मिळवत जिल्ह्यात सुसज्य, जलद अशा रस्त्यांची निर्मीती केली. १४५४ कोटी रुपयांचा निधी मिळवत सहा राष्ट्रीय महामार्गाचा विकास केला. तर गावागावात वाहतुकीच्या सुविधा पोहचाव्यात यासाठी १३६.१३ कोटी रुपयांचा निधी मिळवत २९ गावांत रस्त्यांचे जाळे उभे केले.
दळणवळणाची साधने वाढल्याने उद्योजकांसाठी अहमदनगर हे मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जिल्ह्यात येणार असून स्थानिकांचा रोजगाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.