Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटी दारूविरोधी मोहिमेत शाहूवाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर्ले-बांबवडे रोडवर कापशी गावाजवळ सापळा रचून एका टाटा ट्रकला अडवले.
या कारवाईत सुमारे 1 कोटी 64 लाख रुपयांचा गोवा बनावटी ‘सनकी’ ब्रँडचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ट्रकसह एकूण 1 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ट्रकचालक संतोष बंडू पेटकर याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत मध्यप्रदेशातील असीम अब्दुल्ला शेख याचा सहभाग उघड झाला. त्यानंतर शेखलाही अटक करण्यात आली आहे.
दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की, “मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.”






