Kajal Guru Death : तृतीयपंथी समाजाचे जिल्हा अध्यक्ष व समाजकारणात सक्रीय असणारे काजल गुरु बाबू नायक नगरवाले यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून ते साईदीप हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच तृतीयपंथी समाजासह विविध सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.काजल गुरु हे तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी व सन्मानासाठी आयुष्यभर झटणारे, निर्भीड नेतृत्व होते. व तृतीयपंथीयांसाठी दफनविधीसाठी जागा नव्हती तर काजल गुरु यांनी जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार करून जपून विधीसाठी जागा उपलब्ध करून घेतली व समाजातील तृतीयपंथींना आपले हक्काचे स्थान मिळावे, समाजात त्यांचा सन्मान वाढावा यासाठी त्यांनी असंख्य लढे उभारले.
केवळ आंदोलनच नव्हे तर समाजातील सदस्यांच्या शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तृतीयपंथी हक्क चळवळी यशस्वीरीत्या पार पडल्या.काजल गुरु यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक होते. ते फक्त तृतीयपंथी समाजापुरते मर्यादित न राहता, गरजू आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी पुढे असत.
त्यांच्या निधनाने एक मोठे प्रेरणास्थान हरपल्याची भावना समाजात आहे.अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण याबाबत पुढील माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे. सध्या त्यांच्या निवासस्थानी सर्वच स्तरांतील लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत.