Jayant Patil : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटी वरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असं जयंत पाटील म्हणाले.
तसेच अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवन सारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असेही यावेळी ते म्हणाले.
शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही
या अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी
शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. तसेच आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.