Dnamarathi.com

Israel Attack On Lebanon :  गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले करण्यात येत आहे. तर बुधवारी या हल्ल्यांना प्रतिउत्तर म्हणून हिजबुल्लाकडून इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. 

इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी सैन्यांना लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबतच्या वाढत्या संघर्षाच्या दरम्यान जमिनीवर आक्रमणासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचा हल्ला असाच सुरू राहिल्यास हिजबुल्लाला पूर्ण पाठिंबा देऊ, असे इराणने म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लेबनॉनमध्ये जर जमिनीवर हल्ला केला तर ते ‘ऑल आऊट वॉर’ असेल, असे म्हटले आहे. बुधवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 72 लोक ठार आणि 233 जखमी झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“तुम्ही ओव्हरहेड जेट्सचा आवाज ऐकत आहात. आम्ही दिवसभर हल्ला करत आहोत. हे तुमच्या संभाव्य प्रवेशासाठी आणि हिजबुल्लाला कमकुवत करण्यासाठी मैदान तयार करण्यासाठी आहे,” इस्रायली सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हॅलेवी यांनी इस्रायली सैन्याला सांगितले आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले – लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यूएन जनरल असेंब्लीला सांगितले की, “लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये. आम्ही इस्रायलला लेबनॉनमधील हल्ले थांबवण्याची आणि हिजबुल्लाला इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्याची विनंती करतो.”

इस्त्रायलने हिजबुल्लाहविरोधात सोमवारी सुरू केलेल्या मोहिमेपासून लेबनॉनमध्ये 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. UN च्या आकडेवारीनुसार लेबनॉनमध्ये सुमारे 90,000 लोक विस्थापित झाले आहेत. हे 110,000 लोकांव्यतिरिक्त आहेत ज्यांनी तणाव वाढण्यापूर्वी घरे सोडून पळ काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *