Suresh Dhas : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल आहे.
दरम्यान, आष्टी तालुक्यातील कडा येथे नदीपात्रा शेजारी सापते कुटुंबातील अकरा जण अडकले होते. तसेच शेरी खुर्द येथील काही जण पुरात अडकले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरची सोय करून सुरक्षित बाहेर काढले आहे. दुसरीकडे, बीड- अहिल्यानगर महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कडा शहर परिसरातील ग्रामीण भागात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि याचेच पाणी शहरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंब पाण्यात आहेत.
50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली आले आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता NDRF च्या टीमला पाचरण केले जात आहे. तर अनेक ठिकाणच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सुलेमान देवळा, दौलावडगाव सह परिसरातील 30 गावांचा संपर्क तुटलाय. सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतायत. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. बीड अहिल्यानगर महामार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरम्यान ही परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस यांच्यासह तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कडा, परिसरात चोभा निमगाव, धामणगाव, दादेगाव, देविनिमगाव, शेरी, फत्तेवाडगाव, नांदा, रुईनालकोल, या गावांत पाणी शिरलं असून गावचा संपर्क तुटला आहे. मात्र, सर्व प्रशासनिक पातळीवर आमदार धस यांचं लक्ष असून ते स्वतः लोकांना वाचवण्यासाठी आपल्या साथीदारांसह मैदानात उतरलेले आहेत.
11 जणांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलवलं असून इतरांनाही सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही. घाबरू नका असं आवाहन सुरेश धस यांनी केलं आहे.