DNA मराठी

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत.

स्वतःच्या चमकोगिरीमुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान होत आहे,असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी महाराजांचा असा अवमान का केला जात आहे? जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथे पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे मुद्दाम केले गेले आहे का? असा प्रश्न विचारून रा. स्व. संघ व भाजपच्या नेत्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक अपमान केला ते पाहता हे मुद्दाम केले गेले असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.

सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांच्या प्रतिमेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ लावणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *