तिच्या वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या आणि ती जागीच कोसळली.
गुरुग्राम | प्रतिनिधी
Radhika Yadav – हरियाणामधील उदयोन्मुख टेनिसपटू आणि आयटीएफ क्रमवारीत उल्लेखनीय स्थान पटकावलेल्या राधिका यादव (२५) हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुग्राम येथे घडली. न्यायालयाने आरोपी वडील दीपक यादव यांना शुक्रवारी एक दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.
ही घटना गुरुवारी सकाळी घडली. राधिका घरात नाश्ता तयार करत असताना, तिच्या वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या आणि ती जागीच कोसळली.
तपासानंतर, स्वतःची टेनिस अकादमी सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलेल्या राधिकाच्या यशावरून वडिलांना गावकऱ्यांकडून टीका सहन करावी लागत होती, अशी माहिती समोर आली आहे. “मुलीच्या कमाईवर जगतो,” अशा ताशेरे गावातून झेलावे लागल्यामुळे त्यांनी राधिकावर गोळी झाडण्याचा निर्णय घेतल्याची कबुली दीपक यादव यांनी दिली आहे.
सुरुवातीस सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या की, रील्समुळे किंवा मुलीच्या वागणुकीमुळे ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी यावर स्पष्टपणे स्पष्टीकरण देत सांगितले की अकादमीशी संबंधित वाद व सामाजिक दबावच यामागील प्रमुख कारण आहे.
राधिकाचा खेळातील प्रवास
राधिका यादव हिने अल्पवयातच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती.
- जन्म: २३ मार्च २०००
- आयटीएफ दुहेरी रँकिंग: ११३
- हरियाणातील महिलांमध्ये दुहेरी प्रकारात: ५वे स्थान
- स्वतःची टेनिस अकादमी सुरू करून इतर तरुणींना प्रशिक्षण देत होती
या घटनेने क्रीडा व सामाजिक क्षेत्रात पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. एक यशस्वी मुलगी आपला व्यवसाय उभा करत असतानाही, तिच्या स्वतःच्या वडिलांनी तिचं आयुष्य संपवलं, ही बाब धक्कादायक आहे.
पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, वापरलेली बंदूक, उर्वरित काडतुसे, तसेच राधिकाच्या आईची साक्षही घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.