Dnamarathi.com

Former PM Manmohan Singh Death : देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *