DNA मराठी

माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन

R.T. Jija Deshmukh Dies: भाजपाचे माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन झाल आहे. ही दुःखद घटना रविवारी संध्याकाळी घडली. लातूर जिल्ह्यातील औसा जवळील बेळकुंड येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लातूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड व लातूर जिल्ह्यांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आर.टी. जिजा हे औसाकडे प्रवास करत असताना, बेळकुंडजवळ त्यांच्या गाडीच्या काचांवर रस्त्यावरील पाणी अचानक आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे वाहनाने तीन ते चार पलटी घेतल्या. गाडी (क्रमांक एमएच ४४ २७९७) अपघातग्रस्त झाल्यामुळे त्यात बसलेले जिजा देशमुख गंभीररित्या जखमी झाले.

अपघातानंतर तातडीने त्यांना लातूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक तळागाळातील समाजाशी नाळ असलेला नेता हरपल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *