NCP News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.
महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून प्रचारास सुरवातही केली आहे. त्यासाठीच दि.४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.