Chandrashekhar Bawankule : बबनराव तायवाडे यांनी नागपूरमध्ये ओबीसी समजाला न्यान मिळण्यासाठी आंदोलन केलं होतं त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. ती बैठक आता अतुल सावे घेणार आहेत. या बैठकीत सर्व मागण्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यात सध्या आरक्षणावरून राजकारण तापले असताना ओबीसी नेते देखील आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. यातच आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होईल. या बैठकीत छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, दत्तात्रय भरणे आणि उपसमितीतील सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाजाचे प्रश्न, मागण्या तसेच कोणतेही गैरसमज अथवा शंका मग त्या भुजबळांच्या असोत किंवा इतर मंत्र्यांच्या –त्या सर्व आम्ही ऐकणार आहोत.
भुजबळ न्यायालयात गेले, तर तो त्यांचा निर्णय आहे. मात्र उपसमितीत भुजबळ काय म्हणतात ते आम्ही ऐकू आणि त्यांच्या मनातील शंका दूर करण्याबाबत चर्चा करू.
ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर तो कशा प्रकारे होत आहे यावर चर्चा करू. आणि राज्यात इतर कुणालाही असे वाटत असेल की ओबीसीवर अन्याय होत आहे, तर त्यांनी मंत्रिमंडळ समितीसमोर असा प्रतिवेदन किंवा निवेदन दिल्यास त्यावरही चर्चा होईल असं देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.