DNA मराठी

राजकीय

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले

Devendra Fadnavis: माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये आणण्याचे कोर्ट आदेश देईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात माधुरी हत्तीण आणि वनतारा मुद्दा गाजत असताना आता पुन्हा एकदा माधुरी हत्तीण राज्यात परतणार आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितले की, माधुरी हत्तीणीवर हक्क सांगायची आमची कुठलीही इच्छा नाही. आम्हाला कोर्टाने सांगितल्यामुळे आम्ही हे सर्व केले आहे. त्यानंतर मी त्यांना सांगितले जर असे असेल, तर तुम्ही देखील आमच्यासोबत सुप्रीमकोर्टमध्ये जॉईन झाल पाहिजे, आपण जॉईंटली कोर्टाला विनवणी करू की, माधुरी हत्तीण तेथेच कोल्हापूरमध्ये नागणी मठ मध्ये एक रेस्क्यू सेंटर तयार करून ठेवू. हायपावर कमिटीने जे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या सोयी तेथेच करू, तेथेच तो माधुरी हत्तीणीला आणू, तुम्ही त्याला समर्थन द्या. अशी मागणी केली. त्याला त्यांनी समर्थन दिले आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जर कोर्टाने तसा निर्णय दिला, कोर्ट तसा निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर सर्व तयार करून द्यायला तयार आहेत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर कबूतरखाना प्रकरणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे वाटते की तिकडे आस्था आहे, लोकभावना आहे. आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे, दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहे.ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे. तीदेखील खंडित होणार नाही, आणि आरोग्याचे ही प्रश्न निर्माण होणार नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले Read More »

img 20250807 wa0001

Sharad Pawar: राजकारणात अजूनही पवारांचा ‘सेंटर स्टेज’

Sharad Pawar : राजकीय पटावर मातब्बर नेता म्हणून चार दशके आपली बुद्धिमत्ता, व्यूहरचना आणि निर्णयक्षमता सिद्ध केलेल्या शरद पवार यांच्यासाठी गेले काही महिने विशेषतः आव्हानात्मक ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे जुने, कणखर आणि चाणाक्ष सहकारी पक्षातून बाहेर पडले, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन फाट्यांमध्ये विभागला गेला. साहजिकच, ‘पवारांचे युग संपले’ अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, शरद पवार हे नजरेआड झाले तरी मन:पटलावरून अदृश्य झाले नाहीत, हे त्यांनी आपल्या शांत पण निश्चित पावलांमधून पुन्हा सिद्ध केले. “कुस्ती अजून संपलेली नाही, फड अजून मांडायचा आहे,” हा त्यांचा ठाम संदेश होता. आणि याचे प्रत्यंतर मिळाले ते नुकत्याच काही महिन्यांतील घडामोडींमध्ये विशेषतः आमदार रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेमुळे. रोहित पवारांनी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर ज्या आक्रमकतेने भूमिका मांडल्या, त्या केवळ विरोधकांना अडचणीत आणणाऱ्या नव्हत्या, तर सत्ताधाऱ्यांच्या गोंधळलेल्या रणनीतीलाही तडाखा देणाऱ्या होत्या. मंत्र्यांना थेट जाब विचारण्याची त्यांची शैली, शेतकरी प्रश्नांपासून ते महागाई, भ्रष्टाचार, आणि जलव्यवस्थापनाच्या विषयांवर आवाज उठवण्याची तळमळ पाहता, ‘पवारांची नवी फळी तयार झाली आहे,’ अशी जाणीव राजकीय विश्लेषकांना होऊ लागली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार केवळ शरद पवारांचे नातू म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र, अभ्यासू आणि खंबीर व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येताना दिसत आहेत. ही घडामोड केवळ एक पिढीगत बदल न राहता, एक नव्या राजकीय लढाईची नांदी ठरत आहे. शरद पवार यांचे बलस्थान नेहमीच संकटात संधी शोधण्याचे राहिले आहे. ऐन अडचणीच्या काळातही संयम न सोडता, भक्कम पर्याय उभा करणे हा त्यांचा राजकीय स्वभाव आहे. त्यामुळेच आज जेव्हा अनेक जुन्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली, तेव्हा पवारांनी तरुण नेतृत्वाला पुढे करून, नव्या स्वरूपातील विरोधी भूमिका घडवण्यास प्रारंभ केला. ही भूमिका, केवळ सत्तेच्या विरोधातील नकारात्मक मानसिकतेतून नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या प्रेरणेवर आधारित आहे. शरद पवारांचे राजकारण नेहमीच दीर्घदृष्टी असलेले राहिले आहे. एका बाजूला ते स्वतःची भूमिका सांभाळत आहेत, तर दुसरीकडे नव्या नेतृत्वाला तयार करत आहेत. ‘मोठे नेते गेले तरी पक्ष संपत नाही,’ हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आणि हीच आहे त्यांची नवी खेळी शांत, पण प्रभावी. राजकीय रंगमंचावरून पवारांचा पडदा कधीच खाली जाणार नाही, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. “पवार संपले” असं म्हणणाऱ्यांना त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, “खेळ अजून बाकी आहे!”

Sharad Pawar: राजकारणात अजूनही पवारांचा ‘सेंटर स्टेज’ Read More »

maratha mahamandal

बँकांनी लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत; महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

Narendra Patil : मराठा समाजातील नवउद्योजकांना चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी सुलभ पद्धतीने व विहित कालावधीत मार्गी लावावेत, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले. महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, महामंडळाच्या विभागीय समन्वयक पल्लवी मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम, जिल्हा समन्वयक अमोल बोथे,कौशल्य विकास अधिकारी शुभदा पाठक, अनिल मोहिते, दिलीप भालसिंग व विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, की महामंडळाच्या योजनांद्वारे राज्यातील १ लाख ५० हजार लाभार्थ्यांना उद्योगासाठी १२,६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, १,२२२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १८ हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत १,३४० कोटींचे कर्ज व १२३ कोटी रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाजासाठी, तसेच ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा घटकांसाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना असून, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांचा व्यापक प्रचार-प्रसार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. बँकांनी योजनेचे स्वरूप समजून घेऊन कर्जवाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात कोणताही विलंब होऊ नये. प्रस्तावात त्रुटी असल्यास त्यांचे तात्काळ निराकरण करावे व विनाकारण प्रलंबित प्रस्ताव थांबवू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीदरम्यान पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. अर्ज कुठे व कसा करायचा? ऑनलाईन अर्जासाठी: आपण राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक टप्पे:  कागदपत्रे लागणारी शक्यता (योजनेनुसार थोडी बदलू शकतात):  ऑफलाइन / प्रत्यक्ष अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रकिंवामहामंडळाचा विभागीय कार्यालय / जिल्हा समन्वयक कार्यालय येथे भेट देऊन सहाय्य मिळवता येते.  अहमदनगर जिल्ह्यासाठी संपर्क करा:जिल्हा समन्वयक – अण्णासाहेब पाटील महामंडळ(आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोजगार विभागात याबाबत माहिती मिळू शकते)  मदत हवी असल्यास: महामंडळाची हेल्पलाइन किंवा संपर्क क्रमांक वेबसाइटवर दिलेले आहेत.https://annasahebpatilmvcgmc.gov.in/ContactUs

बँकांनी लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत; महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik : एसटी महामंडळ चालवणार ‘यात्री ॲप’ प्रताप सरनाईक यांची घोषणा

Pratap Sarnaik : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर , परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व इतर अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भरमसाठ नफा कमवून प्रवासी व चालकांना वेठीस धरणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या जोखंडातून मुक्त करण्याच्या प्रमाणित हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी अ‍ॅप बस, रिक्षा , टॅक्सी व ई-बस या वाहन सेवा करीता सुरू करण्याचे निश्चित केले आहे. सदर ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्यात येईल. भविष्यात एस टी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. ” छावा राईड ” नावावर एकमत..! या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो छावा राईड यापैकी एखादे नाव देण्या बाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲप ला ” छावा राईड ॲप ” हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील अे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. बेरोजगार मराठी तरुण-तरुणींना कर्ज देण्यासाठी मुंबै बँकेचा पुढाकार एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकृत ॲप द्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण- तरुणींना मुंबै बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल असे आश्वासन बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. या तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असून, त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे. असे प्रतिपादन आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲप ची नियमावली अंतिम टप्यात आहे. सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ॲप च्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करीत आहेत. एसटी महामंडळडे कडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ व जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित करून चालविण्यासाठी एसटी महामंडळाला दिल्यास त्याचा फायदा प्रवाशां बरोबर एसटी महामंडळाला देखील होईल.

Pratap Sarnaik : एसटी महामंडळ चालवणार ‘यात्री ॲप’ प्रताप सरनाईक यांची घोषणा Read More »

Devendra Fadnavis: महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Devendra Fadnavis: नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठ (ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) येथील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह पथक तयार करणार नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया मार्गाने माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. माधुरी पुन्हा मठात यावी ही जन भावना आहे. ही जन भावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य शासनाचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात येईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्या प्रमाणे सुविधा देण्यात येतील आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जे हत्ती बाहेर नेण्यात आले, अशा सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली. खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदीसह जैन स्वामी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Devendra Fadnavis: महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार Read More »

yavat

Yava Curfew: मोठी बातमी, यवत येथे जमावबंदी आदेश शिथिल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Yava Curfew : दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता गावात १ ऑगस्ट पासून लागू करण्यात आलेले जमावबंदी आदेश सकाळी ६ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ नुसार मौजे यवत येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आता पुढील आदेश होईपर्यंत सकाळी ६ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करुन त्यानंतर जमावबंदी लागू करण्यात येत आहे. या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Yava Curfew: मोठी बातमी, यवत येथे जमावबंदी आदेश शिथिल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Read More »

img 20250805 wa0025

Tukaram Mundhe : “शासन कुणाचे ही असो? मुंढेना “शिस्तीचा शाप की व्यवस्थेचा बळी?”

Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली झाली. गेल्या वीस वर्षांतील 24 वी बदली या आकड्यांकडे सहज नजर टाकली, तर वाटतं एखादा अधिकारी इतक्या वेळा का बदलीला सामोरा जातो? हा प्रश्न पडतो मात्र ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही. तर ही एका धडाकेबाज, कर्मठ आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्याच्या लढ्याची कथा आहे. आणि या लढ्याच्या पार्श्वभूमीला आहे, ही एक अशी व्यवस्था जी शिस्त, पारदर्शकता आणि कडकपणाच्या झळा सहन करू शकत नाही अशी तुकाराम मुंढे म्हणजे कायद्यानं चालणाऱ्या व्यवस्थेचा चेहरा असून त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे शिस्त आणली, भ्रष्टाचाराला वेसण घातली, आणि जनतेच्या हक्कासाठी प्रशासनाला आरसा दाखवत आली. पण हे करत असताना त्यांच्या कडव्या शैलीतून अनेकांचा अहंकार दुखावला गेला, लोकप्रतिनिधींशी वाद झाले, स्थानिक राजकारणाशी उभा-आडवा लागला आणि प्रत्येक वेळी त्यांची बदली ‘प्रशासकीय गरज’ म्हणून लपवण्यात आली हे तितकेच खरे, या वेळी तर त्यांच्या बदलीचा प्रवास अधिकच धक्कादायक झालाय. नागरी आयुक्त, कामगार विभाग आदी जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांची नियुक्ती ‘दिव्यांग कल्याण विभाग सचिव’ या पदावर करण्यात आली. एक महत्त्वपूर्ण पण व्यवस्थेत दुय्यम मानलं जाणारं पदी हे केवळ ‘शिस्तीचा पुरस्कार’ करणाऱ्याची ‘शिस्तीत’ बदली आहे, का व्यवस्थेच्या डोळ्यांत खुपणाऱ्या एका अधिकाऱ्याला ‘साइडलाईन’ करण्याचा प्रयत्न केला? या साऱ्या घडामोडीवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की महाराष्ट्राला आणि देशालाही अजूनही “तुकाराम मुंढे” हवेत. पण व्यवस्थेला त्यांची गरज नसावी, असंच चित्र निर्माण केलं जातय. कारण ही व्यवस्था अजूनही ‘मिळवून घ्या, जुळून घ्या’ या धोरणावर चालत आहे. जो अधिकारी सरळ रेषेत चालतो, तो व्यवस्थेचा बळी ठरतो हे नक्की, आणि जो वाकतो, तो टिकतो. प्रश्न हा आहे की, आपल्या लोकशाहीत ताठ मानेनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण कितपत साथ देतो हे महत्त्वाचे, सोशल मीडियावर त्यांचं कौतुक केल्याने व्यवस्थेत काही बदलणार आहे का? की पुन्हा एकदा ही चर्चा विसरून जाऊ. आणि काही महिन्यांत पुन्हा त्यांच्या नव्या बदलीची बातमी येईल? तुकाराम मुंढे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाहीत तर ते एका प्रशासकीय मूल्यव्यवस्थेचं प्रतीक आहेत. आणि जर त्यांच्यासारखे अधिकारी टिकू शकत नसतील, तर आपल्याला खरंच आत्मपरीक्षणाची गरज आहे असे वाटते. तुकाराम मुंढेंच्या बदल्या ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी, सोलापूर सप्टेंबर 2007 – उपजिल्हाधिकारी, देगलूर जानेवारी 2008 – जिल्हा परिषद सीईओ, नागपूर मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग, नाशिक जुलै 2009 – सीईओ, वाशिम जून 2010 – सीईओ, कल्याण 2011 – जिल्हाधिकारी, जालना 2011–12 – जिल्हाधिकारी, सोलापूर 2012 – सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई नोव्हेंबर 2014 – जिल्हाधिकारी, सोलापूर (दुसरी वेळ) मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, PMPL, पुणे फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई जानेवारी 2021 – पदाधिकारी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान एप्रिल 2023 – सचिव, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग जून 2023 – सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई जून 2024 – विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई 5 ऑगस्ट 2025 – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.

Tukaram Mundhe : “शासन कुणाचे ही असो? मुंढेना “शिस्तीचा शाप की व्यवस्थेचा बळी?” Read More »

sanjay nirupam

मुंबईत मुस्लिमांसाठी हिंदू घरे? लव्ह जिहादनंतर शिवसेना नेते निरुपम यांनी आणला ‘घर जिहाद’

Sanjay Nirupam : मुंबईच्या उपनगर जोगेश्वरीमधील दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प “गृहनिर्माण जिहाद” चा भाग बनले असल्याचा दावा शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी दावा केला आहे की, काही बांधकाम व्यावसायिक पद्धतशीरपणे हिंदू कुटुंबांची घरे मुस्लिम समुदायाला देत आहेत. जोगेश्वरी-ओशिवरा परिसरातील “स्वर्गीय क्षेत्र” मध्ये दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 44 घरे 95 पर्यंत वाढवण्यात आली आहेत. 51 नवीन घरांपैकी बहुतेक घरे मुस्लिम समुदायाला दिली जात असल्याचा दावा पत्रकार परिषदेत संजय निरुपम यांनी केला. तसेच हे सर्व परिसराची धार्मिक ओळख बदलण्याच्या कटाचा भाग म्हणून केले जात आहे. असा देखील दावा त्यांनी केला आहे. मंदिर काढून मदरसा बांधला गेला होता का? निरुपम यांचा सर्वात गंभीर आरोप म्हणजे या भागात असलेले गणेश मंदिर आणि देवी मंडप काढून तिथे एक मदरसा बांधण्यात आला आहे. त्यांनी याला धार्मिक भावना दुखावणारे म्हटलेच नाही तर संस्कृतीविरुद्ध सुरू असलेले षड्यंत्रही म्हटले आहे.

मुंबईत मुस्लिमांसाठी हिंदू घरे? लव्ह जिहादनंतर शिवसेना नेते निरुपम यांनी आणला ‘घर जिहाद’ Read More »

navnath waghmare

Navnath Waghmare : जरांगेची एसआयटी चौकशी लावा अन्…, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आक्रमक

Navnath Waghmare : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगेची एसआयटी चौकशी लावून त्याला बिनभाड्याच्या खोलीत टाका,त्याच्याशिवाय त्याची ड्युटी बंद होणार नाही असं ओबीसी नेता नवनाथ वाघमारे म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी जर सरकारने जरांगे यांचं ऐकून आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सरकारच्या विरोधात काम करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. तसेच जरांगेमुळे EWS आरक्षण गेलं, त्याला समाजाशी काहीही देणं घेणं नाही असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला. याच बरोबर जर जरांगेची एसआयटी चौकशी सुरू झाली तर जरांगे यांचे हजारो लोक मटका, दारू, वाळूत जेलमध्ये जातील असं देखील यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले.

Navnath Waghmare : जरांगेची एसआयटी चौकशी लावा अन्…, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आक्रमक Read More »

Maharashtra Government: दसऱ्या-दिवाळीत आनंद नाहीच? ‘शिवभोजन’ योजनाही अडचणीत

Maharashtra Government: राज्य सरकारची आर्थिक घडी कोलमडली आहे आणि त्याचा थेट फटका सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना बसणार आहे. गेली दोन वर्षे दसरा-दिवाळीसारख्या सणांमध्ये देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. एवढंच नाही तर गरीबांना स्वस्तात जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना देखील बंद होण्याची शक्यता आहे. सोमवारी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची धक्कादायक माहिती दिली. “राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, त्यामुळे ‘आनंदाचा शिधा’ यंदा वाटण्यात येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. शिवभोजन योजनेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, ही योजना सुरू ठेवण्यासाठी 60 कोटींची गरज आहे, मात्र सरकारकडून केवळ 20 कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आता अनेक शिवभोजन केंद्रे बंद करावी लागणार आहेत. काही केंद्रांमध्ये गैरप्रकारही उघडकीस आले आहेत. एका केंद्रात तर सिमेंटची पोती ठेवल्याचे आढळले. नव्या केंद्रांना मंजुरी नाही, थाळ्यांची संख्याही कमी होणार हे सगळं सांगताना त्यांनी सरकारची आर्थिक विवंचना मान्य केली. ‘आनंदाचा शिधा’ योजना नेमकी काय? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना 2022 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदा राबवली गेली. किटमध्ये चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल अशा तीन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. पुढील काळात गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गौरी-गणपती, दिवाळी, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि शिवजयंती अशा प्रसंगीही या किट्सचे वितरण झाले. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे आधीच तिजोरीवर ताण आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. “महिलांसाठी ही योजना अत्यंत गरजेची आहे, पण उत्पन्न वाढत नाही तोवर खर्चाला मर्यादा आणाव्या लागणार,” असे त्यांनी सांगितले. सरकारच्या तिजोरीत खडखड, आणि सणांमध्ये आनंदाची जागा आता चिंता घेणार का? हे प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात घर करत आहेत. सणासुदीच्या काळात सरकारचा आधार मिळेल या अपेक्षेने असलेल्या गरजूंना यंदा निराशा पदरी पडणार हे निश्चित. ‘शिधा’ आणि ‘शिवभोजन’ यांसारख्या योजनांचा गळा कापून अर्थसंकटाला सामोरे जाणे हा शाश्वत उपाय ठरेल का, हा प्रश्न सरकारला आता जनतेसमोर उभा करावा लागणार आहे.

Maharashtra Government: दसऱ्या-दिवाळीत आनंद नाहीच? ‘शिवभोजन’ योजनाही अडचणीत Read More »